वेंगुर्ला पोलिसांनी घडवले सामाजिक कर्तव्याचे दर्शन...!

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान यांची कौतुकास्पद कामगिरी
Edited by: दिपेश परब
Published on: July 16, 2023 15:28 PM
views 860  views

वेंगुर्ला : मागील पाच वर्षात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचार संदर्भात वेंगुर्ला पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिलेल्या आदेश व सूचनांचे पालन करून वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रंजिता चौहान यांनी वेळोवेळी पीडित महिला व पीडित बालिका यांना भेटी देऊन त्यांची विचारपूस केली त्याचप्रमाणे त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यापैकी वेंगुर्ला पोलीस ठाण्यातील पॉक्सो या गुन्ह्यातील पीडित बालिका ही १३ वर्षाची असुन तिच्या घरातील हालाखीची परिस्थिती लक्षात घेऊन, तिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या दडपणातून तिला बाहेर काढण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. पीडित बालिका ही सध्या सातवी मध्ये शिक्षण घेत असून शिक्षणासह ती सध्या आपल्या आजारी आई, आजी आणि आजोबांचा सांभाळ करत आहे.  ही गोष्ट लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह पोलीस हवालदार  सुरेश पाटील, योगेश वेंगुर्लेकर, महिला पोलीस नाईक उषा शिरोडकर यांनी पीडित बालिकेच्या घरी भेट देऊन तिची आई, आजी, आजोबा सह पीडित बालिकेची विचारपूस केली. पीडित बालिका ही शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता अतुल जाधव यांनी आपले सर्वतोपरी प्रयत्न सुरू केलेले आहेत. तिची घरची परिस्थिती लक्षात घेऊन पीडित बालीकेस गृहपयोगी वस्तू घेऊन दिल्या. तसेच ती कोणत्याही दडपणाखाली राहू नये व सध्या तिचेवर जी  जबाबदारी आलेली आहे  ती जबाबदारी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी आपल्या कर्तव्यासह केलेले हे सामाजिक कार्य खरोखर उल्लेखनीय आहे. 


तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान यांनी पीडित महिला व बालिका यांच्याशी संपर्क करून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या कार्याचा सर्वांनी बोध घेतला पाहिजे. आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य तत्परतेने करणारे व एक मिळावु  अधिकारी वेंगुर्ल्यातील नागरिक प्रथमच बघत आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.