गजानन नाईक यांना आदर्श पत्रकार पुरस्कार

वेंगुर्ला नगरवाचनालायचे विविध पुरस्कार जाहीर
Edited by: दिपेश परब
Published on: January 07, 2025 17:40 PM
views 153  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे दिले जाणारे सन २०२४-२५ साठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात आदर्श पत्रकार पुरस्कार गजानन नाईक, आदर्श साहित्यिक पुरस्कार कवयित्री डॉ.शरयू आसोलकर, आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार हरिश्चंद्र भिसे (कळणे), आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार प्रशांत बांदकर (देवगड), आदर्श ग्रंथालय पुरस्कार शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथलयास तर जिल्हास्तरीय व्यापार क्षेत्रातील साहित्यप्रेमी पुरस्कार प्रदिप केळुसकर यांचा समावेश आहे.

नगर वाचनालयातर्फे दरवर्षी विविध दात्यांनी दिलेल्या देणगीच्या रक्कमेतून त्या त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-यांना विविध स्वरूपातील सहा पुरस्कार देण्यात येतात. सहाही पुरस्कारांचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रूपये ५ हजार असे आहे. १९ जानेवारी रोजी वेंगुर्ल्यातील सुप्रसिद्ध डॉ.वामन जनार्दन कशाळीकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.