
वेंगुर्ला : येणाऱ्या गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी, २२ ऑगस्टला वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली गणेश चतुर्थी निमित्त शहरातील चारचाकी -दुचाकी पार्किंग, एसटी मार्ग, वाहतूक कोंडी, विद्युत पुरवठा याच्या नियोजनाबाबत सभा संपन्न झाली. या सभेत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झालेल्या या सभेला पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, वीज वितरण विभागाच्या प्राजक्ता पाटील, एसटी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, व्यापारी संघ अध्यक्ष विवेक खानोलकर, उपाध्यक्ष राजीव पांगम, रिक्षा युनियन अध्यक्ष शेखर धावडे, ठाकरे शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ राऊळ, वासुदेव पेडणेकर, जगन्नाथ खबणेकर, महेश केरकर, पोलीस कोन्स्टेबल बंटी सावंत, मुराद शेख, प्रीतम जाधव आदी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात गणेश कॉम्प्लेक्स, माणिकचौक, शाळा नं. १, सिध्दीविनायक प्लाझा, कन्याशाळा, नगरवाचनालय, पाटील चेंबर्स, लता अपार्टमेंट, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स समोरील मोकळी जागा याठिकाणी चारचाकी पार्कींग, वेंगुर्लेकर वाडी, रामेश्वर मंदिर याठिकाणी तीनचाकी पार्कींग, सप्तसागर ते मारुती मंदिर याठिकाणी मालवाहक तीनचाकी तर सागरत्न मत्स बाजारपेठ, पवनपुत्र भाजी मंडई, लोकमान्य टिळक वाणिज्य संकुल इमारतीचा तळमजला, वेंगुर्लेकरवाडी, सप्तसागर, रामेश्वर मंदिर, मराठी शाळा नं. १ पटांगण याठिकाणी दुचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी कंकाळ यांनी सांगितले. तसेच प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी पोलिस स्टेशन मार्फत पोलिस कर्मचारी ठेवण्याची सुचना देण्यात आली.
५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत एस.टी चा थांबा दरवर्षीप्रमाणे रामेश्वर मंदोरजवळ करणे याबाबत एस.टी महामंडळाने आपल्या सर्व वाहन चालकांना तशा सुचना देण्यात याव्यात. तसेच रामेश्वर मंदिर येथे एस.टी महामंडळ यांचेकडून कर्मचारी नियुक्त करावा अशाही सूचना करण्यात आल्या. माटीचे साहीत्य विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापा-यांना रस्त्याच्या दुतर्फा बसविण्यात येणार आहे. या दोन दिवसांकरिता बॅ खर्डेकर रोडवरील मारुती मंदीर ते दाभोली नाका या रस्त्यांवरुन सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.
तसेच पोलिस स्टेशनमार्फत आवश्यक ठिकाणी बॅरीगेटस् लावून कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात यावी. गणेशोत्सव कालावधीमध्ये गर्दीच्या ठिकाणी चोरी किवा इतर गुन्हेगारी होवू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी. शहरातील महत्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावेत, बाजारपेठेतील व्यापा-यांच्या माल वाहतुक करणा-या गाड्यांना ५ ते १७ ऑगस्ट रात्री ९.०० ते पहाटे ५.०० पर्यंत तसेच इतर दिवशी दुपारी २.०० ते सायं. ५.०० या वेळेतच नगरपरिषदेने ठरविलेल्या जागेत पार्किंग करावे अशाही सूचना करण्यात आल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे वेळेत बुजवून रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे / फांदया तोडून घ्याव्यात, उपजिल्हा रुग्णालय यांचेमार्फत आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी उपाययोजना करावी. वीज वितरण विभागाने विद्युत पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आतापासूनच उपाययोजना कराव्यात. रात्री. १.०० नंतर कार्यालयात कर्मचा-याची नियुक्ती करावी. तसेच शहरातील विद्युत वाहीनीवरील आलेल्या फांदया लवकरात लवकर तोडून घेण्यात याव्यात
गणेशोत्सव सण साजरा करताना प्लॅस्टीक व थर्माकॉलचा वापर करताना कोणीही निदर्शनास आल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही केली जाईल. शुभेच्छा बॅनर लावणा-यांनी नगरपरिषदेच्या परवानगीने व वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. नगरपरिषदेमार्फत विनापरवानगी लावलेले बॅनर जप्त करण्यात येतील. असेही यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सांगितले.
शहरातील बाजारपेठेत होत असलेल्या चोऱ्या लक्षात घेता शहरातील सर्व सीसीटीव्ही गणेशोत्सवाच्या पूर्वी सुरू करावेत अन्यथा २ सप्टेंबर रोजी आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी रिक्षा युनियन अध्यक्ष शेखर धावडे यांनी दिला.