
वेंगुर्ला : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने वेंगुर्ला शहरात नगरपरिषदेतर्फे मतदार जनजागृतीअंतर्गत मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. या रॅलीमध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, तहसिलदार कार्यालय अधिकारी व कर्मचारी, पंचायत समिती वेंगुर्ला अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले होते. मोटारसायकल रॅलीमध्ये मतदार जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या.
ही रॅली वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय हॉस्पिटल नाका घोडेबांव गार्डनमार्गे पावर हाऊस पिराचा दर्गा जुना एसटी स्टॅण्ड दाभोली नाका वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय पार पडलेली आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेचे फायर मोटारसायकल अग्रस्थानी ठेवण्यात आलेले होते. या रॅलीमध्ये मतदार जनजागृतीपर विविध घोषवाक्याचे फलक प्रदर्शित करण्यात आलेले होते. या रॅलीमध्ये नागरिकांकडून उत्सफूर्त सहभाग लाभलेला आहे.
याव्यतिरिक्त महिला बचत गटामार्फत रांगोळी स्पर्धा, मतदार सेल्फी पॉईट, मतदार हस्ताक्षर अभियान, मानवी शृंखला अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली आहे. तसेच नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रभागामध्ये घंटागाडीद्वारे रोज मतदान जनजागृती करण्यात येत आहे. नगरपरिषदेतर्फे राबविण्यात येणा-या उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केले आहे.