
वेंगुर्ले : दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत हिरकणी शहर स्तर संघ यांच्या माध्यमातून सोनचीरैया शहर उपजिविका केंद्र, वेंगुर्ला चे उद्घाटन वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने वेंगुर्ला येथील नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृह येथे सोनचीरैया शहर उपजिविका केंद्राची स्थापना करण्यात आली.
यावेकी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, संपादक शेखर सामंत, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, सहा. प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे, समूह संघटक अतुल आडसूळ व हिरकणी शहर स्तर संघाच्या शामल केनवडेकर, स्वाती बेस्ता, सुहानी जाधव, वैभवी पालव, मेघा पडते, सुशिला रेडकर, शिवानी ताम्हणेकर, गितांजली जाधव यांच्यासाहित बचत गटाच्या बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
भविष्यात महा ई सेवा केंद्र, झेरॉक्स सेंटर, लॅमिनेशन इ. सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रयोजन यात करण्यात आले आहे. यामधून शहरातील महिलांना मुख्य प्रवाहात आणून रोजगार निर्मिती करणे हा मुख्य उद्देश असल्याचे मत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी यावेळी व्यक्त केले.