
वेंगुर्ला : शिरोडा वेळागर समुद्रात ३ ऑक्टोबर रोजी बुडालेल्या ७ जणांपैकी बेपत्ता असलेल्या दोघांचे मृतदेह आज कालवीबंदर व वेंगुर्ला समुद्रात आढळून आले. यापूर्वी ५ जणांचे मृतदेह आढळून आले होते.
बेळगाव येथील इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (३६) यांचा मृतदेह केळुस निवती येथे समुद्रातून आढळून आला. निवती पोलीस ठाण्याचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार कांदळगावकर, सोनसुरकर, कदम, गोसावी, कुंभार यांनी तो बाहेर काढला. तर कुडाळ -पिंगुळी येथील जाकीर निसार मणियार (१३) याचा मृतदेह नवाबाग येथून समुद्रामध्ये सुमारे ६ किलोमीटर येथून वेंगुर्ला पोलीस ठाणे अधिकारी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक दाभोलकर, राठोड, व अंमलदार कदम, सरफदार, राऊळ, तांबे, जोसेफ, सरमळकर, देसाई, मांजरेकर, परुळेकर यांनी बोटीने बाहेर काढला आहे. दोन्ही मृतदेहाची खात्री त्यांच्या नातेवाईकांनी केलेली आहे.
ही शोधमोहीम पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साठम,उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली. तसेच सदर शोध मोहीमसाठी मत्स्य विभागाचे ड्रोन वापरण्यात आले व महसूल प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी हेमंत निकम व तहसीलदार ओंकार ओतारी यांचे मार्गदर्शन मिळाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.










