वझरेच्या वेदांता सेसा कोकचं टीबी मुक्त भारत मिशन

10 टीबी रुग्णांच्या आहाराची जबाबदारी
Edited by: संदीप देसाई
Published on: October 14, 2022 19:20 PM
views 176  views

दोडामार्ग :  वेदांता सेसा कोक वझरे यांनी केंद्र सरकारच्या ‘नि-क्षय मित्र’ अभियानामध्ये सहभागी होऊन पुढील सहा महिन्यांसाठी १० टीबी रुग्णांना पोषण आहारासाठी पालकत्व स्वीकारत समाजासमोर एक मोठा संदेश ठेवला आहे. सातत्याने आपल्या सीएसआर फंडातून वेदांता सेसा कंपनी विविधांगी समाजपयोगी उपक्रम राबवित असते.  आता पुन्हा एकदा या कंपनीनं टीबी मुक्त भारत अभियानात सहभाग नोंदवून रुग्णांना मदत करण्याचे ठरविले आहे.

   देशाच्या राष्ट्रव्यापी मिशनचे प्रधान मंत्री टीबी मुक्त भारत अभियान (PMTBBA) ज्याचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत भारतातून क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे आहे. त्या अभियानात वेदांता सेसा गोवाच्या वझरे येथील कंपनीनं सहभाग घेतला आहे.  आज सेसा कोक, वझरेचे प्रमुख  बाबाजी पागिरे, यांनी  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांच्याकडे ऑक्टोबर महिन्याच्या पोषण आहार पॅकेट सुपूर्द केल्या आहेत. मणेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी वेदांताचे आशिष पिळणकर, नीलेश झोरे, डॉ. शशिकांत शिवोलकर, आरोग्य विभागाचे सुरेश मोरजकर, जनार्दन गोसावी तसेच आरोग्य विभागाचे इतर कर्मचारी व लाभार्थी यावेळी उपस्थित होते. डॉक्टर रमेश कर्तस्कर यांनी यानिमित्ताने वेदांता कंपनीच्या या समाजपयोगी आरोग्यादायी  उपक्रमाला मदत केल्याबद्दल विशेष आभार मानले. बाबाजी पागिरे यांनी कंपनी तर्फे अशा उपक्रमासाठी नेहमीच सहकार्य असेल अशी ग्वाही दिली.

 अनिल अग्रवाल फाउंडेशनच्या अंतर्गत, सेसा कोक वझरे यांनी दोडामार्ग येथे सामुदायिक आरोग्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत, जसे की आजारी रुग्णांसाठी सुसज्ज रुग्णवाहिका सेवा आणि दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला विविध आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि आता थेट रुग्णांना साहाय्य असे उपक्रम कंपनीनं हाती घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांतून कंपनीच्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे.