वस्त्रहरण हाऊसफुल्ल...

दिग्गज कलावंतांनी सावंतवाडीकरांना खळखळून हसवलं !
Edited by: विनायक गांवस
Published on: April 30, 2025 19:42 PM
views 97  views

सावंतवाडी : जगप्रसिद्ध नाटक वस्त्रहरण ५ हजार ५५५ व्या प्रयोगाकडे घोडदौड करत असताना कोकणात या नाटकाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रसाद कांबळी निर्मित, गंगाराम गवाणकर लिखीत, कै. रमेश रणदिवे दिग्दर्शीत, तालीम मास्तर मंगेश कदम, निर्मीती कविता मच्छिंद्र कांबळी यांच्या वस्त्रहरण नाटकाचं आयोजन लोकमान्य मल्टी. सोसा.च्या वतीनं करण्यात आलं होतं. सावंतवाडीच्या बॅ नाथ पै सभागृहात रसिकांच्या उदंड प्रतिसादात हा प्रयोग पार पडला.

भद्रकाली प्रोडक्शनच वस्त्रहरण नाटक कोकणचे सुपुत्र, मच्छिंद्र कांबळी यांच्या मेहनीतन सातासमुद्रापार पोहचलं. आजही या नाटकाची क्रेझ तशीच कायम आहे. लवकरच हे नाटक साडे पंच्चावन्न हजार प्रयोगांचा टप्पा गाठणार आहे. लोकमान्य फाउंडेशनतर्फे या प्रयोगाच सावंतवाडीत आयोजन करण्यात आले होते. नाट्यरसिकांची भूमी असलेल्या सावंतवाडीत या प्रयोगाला उदंड प्रतिसाद मिळाला. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थित हा नाट्यप्रयोग संपन्न झाला. अस्सल मालवणी भाषा, कानांना गोड वाटणाऱ्या शिव्या, महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण  अन् तेवढ्याच ताकदीचा अभिनय पहायला मिळाला.

दिग्गज मराठी अभिनेते अरुण कदम, प्रियदर्शन जाधव, सुनील तावडे, किशोरी आंबिये, दिगंबर नाईक, अंशुमन विचारे, पुष्कराज चिरपुटकर, रेशम टिपणीस, प्रणव रावराणे, उमाकांत पाटील, ओंकार गोवर्धन, मुकेश जाधव,  सचिन सुरेश, राजेश भोसले आदी मातब्बर कलाकारांच जबरदस्त टायमिंग, अभिनय, संवाद, विनोदामुळे सावंतवाडीकर खळखळून हसले. तेवढ्याच तोलामोलाची साथसंगत श्री. पाध्ये अन् सहकाऱ्यांनी केली. टेलिव्हिजन, सिनेमात दिसणारी ही स्टारकास्ट मंडळी नाट्यप्रयोगानिमीत्त सावंतवाडीत आल्यानं अनेकांना सेल्फीचा मोह आवरता आला नाही. लोकमान्य फाउंडेशनतर्फे या कलावंतांचा यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.