
बांदा : पडवे माजगाव येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी जनजागृती, किसान क्रेडीट कार्ड, काजू मोहोर व पिक संरक्षण असा तिहेरी उद्देश ठेऊन मंडळ कृषी अधिकारी बांदा व ग्रामपंचायत पडवे माजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा संपन्न झाला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. बनकर यांनी पौष्टिक तृणधान्य, पिकांचा आहारातील महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांचे पाककला कृतींचे स्पर्धा घेणेबाबत उपस्थित महिला भगिनींना आवाहन केले. मंडळ कृषी अधिकारी श्री भुईंबर यांनी सेंद्रिय शेती प्रकल्प, मसाला पिक लागवड, मग्रारोहयो फळपिक लागवड याविषयी चर्चा व मार्गदर्शन केले. तसेच काजू मोहोर व पिक संरक्षण याबाबत कृषी पर्यवेक्षक अजमुद्दीन सरगुरू यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक प्रकाश घाडगे यांनी केले तर आभार अतुल माळी यांनी मानले.
कार्यक्रमाची सुरूवात जि. प. शाळा पडवे माजगाव शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी तृणधान्य पिकाचे फलक हाती घेऊन प्रभात फेरीद्वारे केली. लोकांनी आहारामध्ये अधिकाधिक पौष्टिक तृणधान्यांचा वापर, रब्बी क्षेत्र विस्तार याबाबत प्रचार, प्रसिद्धी करण्यात आली.
यावेळी सरपंच नयना देसाई, उपसरपंच प्रज्ञा देसाई, पोलीस पाटील अरविंद देसाई, विलवडे कृषी सहाय्यक श्रीमती वसकर, सातार्डा श्री. गाड, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, गट संयोगिनी यांचेसह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.