सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्गात आज विविध उपक्रम

अर्चना घारे - परब यांचं आयोजन
Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 12:43 PM
views 124  views

दोडामार्ग : संसदरत्न खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त व दशावतार कलाकार समिती दोडामार्ग द्वितीय वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून विविध उपक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. 


आज शुक्रवारी 30 जून 2023 रोजी सायं. 6 वाजता दशावतार कलाकार समिती, दोडामार्ग यातील कलाकारांचा सत्कार सोहळा तसेच इयत्ता दहावी, बारावी, उच्च शिक्षण, पदवी प्राप्त केलेल्या दशावतार कलाकार यांच्या मुलांचा गुणगौरव सोहळा पार पडणार आहे. इयत्ता दहावी, बारावी परीक्षेत सन 2023 या वर्षी उत्तीर्ण होऊन तालुक्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विध्यार्थी यांचा गुणगौरव केला जाणार आहे. तर सायं. 7 वाजता दोडामार्ग तालुक्यातील निवडक नामवंत दशावतारी कलाकार यांचा संयुक्त पौराणिक दशावतारी नाटय प्रयोग "सुवर्ण मुद्रिका" हा नाट्यप्रयोग श्री देव खंडोबा सभागृह सरगवे पुनर्वसन येथे होणार आहे. 


दशावतार क्षेत्रातील अभिनय कौशल्य, भाषा प्रभुत्व, उत्कृष्ट रंगभूषा आणि वेशभुषा या कलागुणांसह लोकपरंपरेचा वारसा अविरतपणे सुरु ठेवल्याबद्दल आणि दशावतार चळवळीतील आपल्या अमूल्य योगदानाबद्दल सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोकणची ओळख असणाऱ्या दशावतार कलाकारांच्या कार्याचा सन्मानपूर्वक गौरव करणार आहोत. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याच अर्चना घारेंनी सांगितलं. दरम्यान, या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केले आहे.