
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातून लवकरच चौथी 'वंदे भारत' एक्स्प्रेस धावणार आहे. जून महिन्यात ती सुरु होणार आहे. मुंबई- गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर धावू लागली. तसेच मुंबईवरुन शिर्डीसाठी ही एक्स्प्रेस सुरु झाली. आता चौथी गाडी मुंबई-गोवा सुरु होणार असून येत्या ३ जूनपासून ही गाडी धावणार असल्याने कोकणवासीयांना कमी वेळेत गावी जात येणार आहे. दरम्यान, तळकोकणात या गाडीला एकाच ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकणवासीय आणि चाकरमान्यांना लागून राहिलेली उत्सुकता अखेर संपली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ३ जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा कंदिल दाखवला जाणार आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही गाडी पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी सुटेल. ठाण्याला सकाळी ६ वाजून ५ मिनिटाला पोहचणार आहे. पनवेल ही गाडी ६ वाजून ४० मिनिटांनी पोहचणार आहे. कोकणात खेडला ही गाडी सर्वात आधी पोहचणार आहे. खेड रेल्वे स्थानकात ही गाडी सकाळी ८ वाजून 40 मिनिटांनी पोहचणार आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकात ही गाडी 10 वाजता पोहचणार आहे. तर सिंधुदुर्गात केवळ कणकवली येथे ही गाडी ११ वाजून २० मिनिटांनी थांबणार आहे. दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी गाडी मडगावला पोहचणार असल्याची माहिती समोर येत आहे.
परतीच्या प्रवासात रत्नागिरीत ५.३५ वेळ आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री १०.३५ वाजता पोहोचेल. या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे. मुंबईकडून मडगावकडे जाताना कणकवली येथे ही गाडी ११ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. मडगाव येथून सुटल्यावर मुंबईकडे जाताना कणकवली येथे ४ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. रायगड जिल्ह्यात रोहा व पनवेल येथे थांबा देण्यात आला आहे. मडगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना रोहा येथे रात्री ८ वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. पनवेल येथे ९ वाजून १८ मिनिटांनी पोहोचेल.
दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेसला महाराष्ट्रातील शेवटच स्टेशन असणाऱ्या सावंतवाडीत थांबा मिळावी अशी मागणी विविध संघटना राजकीय नेतेमंडळींकडून करण्यात आली होती. मात्र, सिंधुदुर्गात केवळ एकाच ठिकाणी थांबा मिळाल्यानं सावंतवाडीत थांबा मिळावा अशी मागणी करणाऱ्या संघटनांच्या भुमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.