फक्त सावंतवाडीलाच का डावलले..?

Edited by: विनायक गांवस
Published on: September 14, 2024 11:22 AM
views 1518  views

सावंतवाडी : कोल्हापूर -पुणे आणि पुणे -  हुबळी मार्गावर नवीन वंदे भारत येत्या १६ तारीख पासून सुरू होत आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ही वंदे भारत ट्रेन कोल्हापूरकरांचा दबावानंतर कोल्हापूरकरांना पुण्यासाठी स्वतंत्र वंदे भारत मिळाली.

पुण्याहून कोल्हापूरसाठी सुरू झालेली ही वंदे भारत मिरज, सांगली,किर्लोस्करवाडी, कराड, सातारा येथे थांबेल, तसेच हुबळी साठी सुरू झालेली वंदे भारत सातारा,सांगली,मिरज,बेळगाव,धारवाड येथे थांबेल

या दोन्ही वंदे भारत ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाड्या सांगली जिल्ह्यातील सांगली आणि मिरज या दोन्ही स्थानकांवर थांबणार आहेत. या स्थानकातील अंतर आहे अवघे ७ किलोमीटर, तसेच कोल्हापूर वंदे भारत ही कराड आणि किर्लोस्करवाडी येथे देखील थांबेल,कराड ते किर्लोस्करवाडी स्थानकादरम्यान अंतर हे ३५ किलोमीटर आणि किर्लोस्करवाडी ते सांगली हे अंतर ३२.७ किलोमीटर आहे.म्हणजेच एकूण ३२६ किलोमीटरच्या या पूर्ण प्रवासात या गाडीला मध्ये ५ थांबे देण्यात आले.

परंतु कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेली मडगाव - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ कणकवली येथे थांबते. या गाडीला सावंतवाडी थांबा मिळावा म्हणून स्थानिकांनी आणि प्रवासी संघटनांनी आपल्या परीने प्रयत्न केले आहेत. तसे बघता कणकवली ते सावंतवाडी रेल्वे स्थानक हे अंतर ४९ किलोमीटर आहे आणि सावंतवाडी ते थिवी (गोवा) हे अंतर ३२.५ किलोमीटर आहे. जर कोल्हापूर वंदे भारत ही ०७, ३२.७ आणि  ३५ किलोमीटर दरम्यानच्या अंतरावर थांबू शकते तर मडगाव वंदे भारत सावंतवाडी स्थानकावर का थांबू शकत नाही असा सवाल सावंतवाडी येथील जनता करत आहे. या व्यतिरिक्त मुंबई ते मडगाव या ७६५ किलोमीटर ( कोल्हापूर - पुणे स्थानकाच्या अंतरापेक्षा दुप्पट )

अंतरात केवळ ७ थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी सावंतवाडी साठी वेगळा न्याय का, सावत्र वागणूक का ? आणि सावंतवाडी हे ऐतिहासिक, पर्यटन शहर असूनही या ठिकाणी वंदे भारत का थांबत नाही असे मत कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे सचिव मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांनी व्यक्त केले.