परभणीत संविधान प्रतिकृती शिल्पाची विटंबना

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
Edited by:
Published on: December 13, 2024 18:11 PM
views 330  views

सिंधुदुर्गनगरी : परभणी येथील संविधान प्रतिकृती शिल्पाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी भाजपा सरचिटणीस चंद्रकांत जाधव आणि भाजपा अनु. जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे.

परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेले संविधान प्रतिकृती शिल्प स्टँड वरून उकडून काढून त्याची विटंबना करण्यात आली. हा सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न अशा मोडतोड करणाऱ्या जातीवादी व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. आंबेडकरी समाजाच्या व संविधान प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे मोडतोड केलेल्या ठिकाणी पूर्ववत त्याच ठिकाणी संविधान प्रतिकृती शिल्प बसवावी, पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत आणि ज्या आरोपींनी हा प्रकार केला आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी भाजपा अनु जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी भाजपा सरचिटणीस चंद्रकांत जाधव, विनोद कदम, चिन्मय पावसकर, वासुदेव जाधव, गुणाजी जाधव, अनंत आसोलकर, संतोष जाधव, देवदत्त कदम, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.