वैभववाडी : नेर्ले गावात जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेची हस्तांतरण प्रक्रिया संशयास्पद आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नेर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच निलांबरी पांचाळ यांनी उपकार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.
नेर्ले गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे २७ लाख रुपये खर्चून नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने किमान एक वर्ष योजना चालविणे बंधनकारक होते. त्यानंतर ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या तीन वर्षांत ठेकेदार अथवा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीशी कोणताही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे योजनेचे अधिकृत हस्तांतरण झाले नसल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.
सरपंच निलांबरी पांचाळ यांनी सांगितले की, आजपर्यंत हस्तांतरण करारावर आपण कोणतीही स्वाक्षरी केलेली नाही. तसेच योजनेच्या हस्तांतरणासाठी कोणीही ग्रामपंचायतीकडे आलेले नाही. मात्र, मक्तेदाराने खोटा शिक्का व बनावट स्वाक्षरीचा वापर केला असावा, असा संशय असल्याने या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता विनोद इंगवले यांनी, नेर्ले जलजीवन योजनेचे हस्तांतरण २२ फेब्रुवारी २०२४ रोजी झाल्याचे सांगितले. तसेच त्यासंदर्भातील पत्र ग्रामपंचायतीकडून प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केला.
मात्र, सरपंच व ग्रामसेवक यांनी योजनेचे हस्तांतरण झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे विभागाकडे सरपंचांच्या स्वाक्षरीचे पत्र असल्याचा दावा करण्यात येत असल्याने नेर्ले गावात नेमके सत्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणामुळे गावात विविध चर्चांना उधाण आले असून संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.










