
सावंतवाडी : शैक्षणिक गुणवत्तेत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ ने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या 'गणित प्रज्ञा' परीक्षेसाठी या शाळेतील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली असून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यावर्षी सावंतवाडी शाळा नंबर ४ मधील खालील पाच विद्यार्थ्यांनी आपल्या गणितातील कौशल्याच्या जोरावर या परीक्षेसाठी पात्र ठरून यश संपादन केले आहे. यात उर्वी दत्तात्रेय आठलेकर, राजनंदिनी चंद्रशेखर सावंत, अनुप्रिया अजित राणे, उर्वी अमितकुमार टक्केकर, देवाशिष विलास फाले यांनी यश संपादित केले. विद्यार्थ्यांच्या या यशात त्यांचे वर्गशिक्षक महेश पालव यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले आहे. गणितासारख्या विषयाची गोडी लावून महेश पालव यांनी मुलांकडून करून घेतलेली तयारी सार्थ ठरली आहे. तसेच शाळेतील इतर सहकारी शिक्षकांचेही या यशासाठी बहुमूल्य योगदान लाभले आहे. या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व पाचही विद्यार्थ्यांना पुढील मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.










