
वैभववाडी : तालुक्यातील कुसूर - गवळवाडी - तिरवडे या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून गेली दोन वर्षे सुरू असलेले रस्त्याचे काम अजूनही पूर्णत्वाला गेलेले नाही. सध्या या मार्गावर खडीकरणाचे काम सुरू असले तरी कामाची गती अत्यंत मंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठेकेदाराचा सुस्त कारभार सुरू आहे. संबंधित विभागाचे अधिकारी निद्रिस्त असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या मार्गाचे काम मागील वर्षापासून सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. दोन वर्षे सुरू असलेल्या या कामामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. पहिल्या वर्षांत मातीसह केलेल्या खडीकरणामुळे पावसाळ्यात वाहतूक बंद होती. सध्या या रस्त्यावर खडीकरणाचा दुसरा थर टाकण्यात येत आहे. या कामामुळे गेल्या वीस दिवसांपासून गावातून धावणारी एसटी बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी शाळकरी विद्यार्थ्यांना तसेच कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांना दररोज चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. विशेषतः सकाळी शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
यापूर्वी रस्त्यावर टाकलेल्या मातीमुळे उडणाऱ्या धुळीने नागरिक त्रस्त झाले होते. आता खडीकरणाच्या कामामुळे रस्त्यावर पूर्णपणे खडी पसरवून ठेवली असून वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण बनले आहे. दुचाकीस्वारांना घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर चारचाकी वाहनांनाही खडीमुळे नुकसान सहन करावे लागत आहे. ग्रामस्थांच्या मते, कामाची कोणतीही ठोस वेळमर्यादा जाहीर करण्यात आलेली नाही. या कामाबाबत ना ठेकेदाराकडून योग्य नियोजन दिसून येत आहे, ना संबंधित विभागाकडून कामावर देखरेख केली जात आहे. परिणामी नागरिकांना रोजच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
कुसूर - गवळवाडी - तिरवडे हा मार्ग परिसरातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, एसटी सेवा पूर्ववत सुरू करावी आणि कामाची गती वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.










