वाभवे - वैभववाडी शहरात बिबट्याचा वाढता उपद्रव

नगराध्यक्षांकडून वनविभागाला तातडीची मागणी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 12, 2026 12:39 PM
views 139  views

वैभववाडी : वाभवे - वैभववाडी शहरातील निवासी वस्त्यांमध्ये बिबट्याचा वाढता वावर आणि माकडांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष श्रद्धा रोहित रावराणे यांनी वनविभागाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नगराध्यक्षांनी वनविभाग सावंतवाडी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत बिबट्याचे दर्शन होत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही ठिकाणी नागरिकांच्या घरांजवळ बिबट्या फिरत असल्याच्या घटना समोर आल्याने भीतीचे सावट पसरले आहे.त्याचबरोबर शहरात माकडांच्या कळपांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून घरांच्या छपरांवर, अंगणात तसेच बाजारपेठ परिसरात माकडांचा त्रास वाढला आहे.

माकडांकडून फळझाडे, घरातील साहित्य आणि शेतीपिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी नगरपंचायतीकडे प्राप्त झाल्या आहेत.त्यांनी वनविभागाला दिलेल्या निवेदनात,बिबट्याच्या वावर असलेल्या भागात तात्काळ पिंजरे लावून त्याला जेरबंद करावे,शहरात, विशेषत: रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी,उपद्रवी माकडांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी तज्ज्ञ पथक पाठवावे,नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करावी या मागण्या केल्या आहेत. परिस्थिती गंभीर बनण्याआधी कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने आणि ठोस कारवाई करावी,” अशी मागणी नगराध्यक्षांनी निवेदनाद्वारे केली आहे.