
देवगड : आंबा बागायतदार व व्यापारी संघ, देवगड यांच्या वतीने आंबा बागायतदारांपुढील गंभीर आर्थिक संकट,पीक कर्जमाफी, हमीभाव तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आंबा संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.यावेळी संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आंबा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणी मांडल्या. या निवेदनावेळी संघाचे अध्यक्ष काका ढोके यांच्यासह उत्तम भडसाळे, तुषार पाळेकर, किरण टेंबुलकर, गणेश गावकर, विजय कुळकर,गणेश वाळके,पांडुरंग घाडी,बंडू धुरी, प्रशांत शिंदे तसेच जवळपास १०० बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवकाळी पाऊस, बदलते हवामान, वाढते उत्पादन खर्च, कीड-रोगांचा प्रादुर्भाव तसेच बाजारातील अस्थिर दर यामुळे बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात आंबा पीक कर्जमाफी जाहीर करावी, बागायतदारांना हमीभाव द्यावा, विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, तसेच जिल्ह्यात आधुनिक आंबा संशोधन व विकास केंद्र स्थापन करून हवामान बदल, कीड-रोग नियंत्रण, दर्जेदार उत्पादन व निर्यातवाढ यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.










