
वैभववाडी : लोरे हेळेवाडी येथील मंथन अशोक जाधव या तरुणाची सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघात निवड झाली आहे.त्याने तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची ३६वी किशोर गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा पुणे येथे होणार आहे.या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला.या संघात वैभववाडी तालुक्यातील लोरे येथील मंथन याला स्थान मिळाले आहे. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, तालुक्यातील युवकांसाठी तो प्रेरणास्थान ठरला आहे.
या यशानंतर लोरे हेळेवाडी स्पोर्ट्स ग्रुप आणि गावातील ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत मंथनचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच विलास नावळे यांनी मंथनचा सत्कार करून त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी “गांगो चाळा कबड्डी संघासाठी लागेल ते सहकार्य देऊ,” अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला स्पोर्ट्स ग्रुपचे सदस्य दिलीप मांजलकर, विनोद मोरे, गुरू डोंगरे, सुभाष नावळे, सुभाष कुडतरकर, बाबू सावंत, अमित मांजलकर, भरत मांजलकर, प्रकाश गव्हाणकर, जगदीश नराम, दिलीप मांडवकर, राकेश आग्रे, सुधीर आग्रे, राज मांजलकर, संतोष मोरे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंथनच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










