
वैभववाडी : जळगाव येथे पार पडलेल्या “इंद्रधनुष्य २०२५” या २१ व्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्ष संजय नकाशे याने संगीत व गायन क्षेत्रात तब्बल पाच पदकं पटकावली आहेत.त्याच्या या कामगिरीबद्दल त्याच सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्यातील विविध विद्यापीठांचा युवा महोत्सव जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात राज्यातील २५ विद्यापीठांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या संघात आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचा प्रतिनिधी म्हणून हर्ष नकाशेची निवड झाली होती. त्याने एकूण सहा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून त्यापैकी पाच स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याचा अभूतपूर्व यशाचा मान त्याने पटकावला आहे.हर्ष नकाशे याने भारतीय शास्त्रीय गायनात सुवर्ण पदक,भारतीय समूह गायनात सुवर्ण पदक,पाश्चिमात्य समूह गायनात सुवर्ण पदक,नाट्यसंगीत गायनात रौप्य पदक,भारतीय लोकवाद्य संगीत गायनात रौप्य पदक
असे एकूण पाच पदकं मिळवली आहेत.या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी तसेच प्राध्यापक वर्गाने हर्षचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. हर्ष नकाशे हा गेली अनेक वर्षं संगीत, गायन आणि शास्त्रीय कला क्षेत्रात आपला ठसा उमटवत असून, विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये त्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे.










