
वैभववाडी : एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या वैभववाडी तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून शिक्षक संदेश तुळसणकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक रामचंद्र दळवी व सीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याध्यक्ष महेश सावंत आणि जिल्हाध्यक्ष चेतन बोडेकर यांच्या प्रयत्नातून ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
एस. आर. दळवी (I) फाऊंडेशन ही संस्था शिक्षक सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या दुहेरी उद्देशाने कार्यरत आहे. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवकल्पना आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था विविध उपक्रम राबवते. संस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम, शिक्षकांसाठी प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित केल्या जातात तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरवही केला जातो. वैभववाडी तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे: उपाध्यक्ष अर्जुन जयवंत बोरकर, निलोफर मौला शेख, सचिव: राजेश कानु कळसुलकर, सहसचिव गणेश जयराम सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संध्या संदीप शेळके आणि प्रफुल तुकाराम जाधव यांची सल्लागार म्हणून निवड झाली आहे.निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे एस. आर. दळवी फाऊंडेशनतर्फे अभिनंदन करण्यात आले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.
अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर श्री.तुळसणकर म्हणाले,“शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जाईल.तसेच “संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे,” असे आवाहनही त्यांनी केले.










