वैभववाडीत २ हजार २२९ विद्यार्थ्यांना वय - अधिवास दाखले

२९८ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र | सेवा पंधरवडा
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 16, 2025 10:37 AM
views 23  views

वैभववाडी :  शासनाच्या सेवा पंधरावड्याच्या उपक्रमाअंतर्गत वैभववाडी तालुक्यातील ११० शाळांमधील २ हजार २२९ विद्यार्थ्यांना वय-अधिवास प्रमाणपत्र, तर २९८ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सूर्यकांत पाटील यांनी दिली.

येथील तहसील कार्यालयात पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती.यावेळी श्री पाटील यांनी माहिती दिली.ते म्हणाले,शासनामार्फत दि १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत  सेवा पंधरावडा साजरा करण्यात आला. या पंधरावड्यात महसूल विभागाकडून विद्यार्थ्यांना शासकीय दाखले सहजपणे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

त्यानुसार तालुक्यातील ९२ प्राथमिक आणि १८ माध्यमिक अशा एकूण ११० शाळांमध्ये प्रचार व जनजागृती करण्यात आली.विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यात अडचण येऊ नये यासाठी ग्रामपंचायत आणि शाळास्तरावर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच तलाठी यांनीही कागदपत्रांची पूर्तता करून विद्यार्थ्यांना मदत केली. परिणामी, सेवा पंधरावड्याच्या कालावधीत प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर १०० टक्के काम पूर्ण झाले असून सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत.ज्या सेतू सुविधा केंद्रावरून अर्ज दाखल करण्यात आले होते, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्याचे काम सुरू आहे. महसूल प्रशासनाने हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच सहभागी सर्व यंत्रणांच तहसीलदार यांनी कौतुक केले.