
वैभववाडी : हातात टाळ, विणा व भागवताची भगवी पताका खांद्यावर घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो भाविक नाधवडे येथे जमले होते.या वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रतिपंढरपुरच चित्र या नगरीत अवतरल होत.विठ्ठल नामाच्या गजरात नाधवडे नगरी दुमदुमून गेली होती. गेली तीन वर्षे नाधवडे येथील मुंबई व गावकरी एकत्र येऊन श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करीत आहेत.यावर्षीचे हे चौथे वर्ष आहे.या सोहळ्याला सकाळी ६ वा प्रारंभ झाला.प्रथम विठ्ठल रखुमाईची विधीवत पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली.ब्राम्हणांच्या मंत्रघोषात हा सोहळा संपन्न झाला.त्यानंतर गावातील श्री चवाटी माता मंदिरात भजन व आरती करण्यात आली.याठिकाणी प्रथम रिंगण करून जिल्हाभरातून आलेल्या वारकऱ्यांची दिंडी विठ्ठल रखुमाई मंदिराकडे प्रस्थान झाली.या दिंडीत अबालवृद्धांसहीत हजारो वारकरी सहभागी झाले होते.भजन, फुगड्या व विठ्ठल नामाचा जयघोष करीत ही दिंडी विठ्ठल रखुमाई मंदिरात पोहचली.याठिकाणीही वारकऱ्यांनी रिंगण घालुन दिंडीची सांगता केली.जिल्हाभरातून आलेल्या वारकऱ्यांनी विठ्ठल रखुमाईच दर्शन घेतले. या उत्सवा निमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सत्रात वारकरी भजन, हरिपाठ, किर्तन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.शेज आरतीने या सोहळ्याची सांगता झाली.
हजारो भाविकांनी दर्शन घेतले..
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई मंदिरात वारकरी व भाविकांनी गर्दी केली होती.सायकांळी उशीरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम होती.अनेक लोकप्रतिनिधींनी विठ्ठल रखुमाईच दर्शन घेतले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंनी आज(ता. ६) सकाळी नाधवडे येथे विठ्ठल रखुमाईच दर्शन घेतले.यानंतर बोलताना मंत्री राणे म्हणाले,या देवस्थानसाठी नियोजन मधून भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल.येथील सर्व समस्या मार्गी लावल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले.
भर पावसात वारकरी नाचण्यात दंग..
आषाढी एकादशी निमित्त काढलेल्या दिंडीत हजारो वारकरी सहभागी झाले होते.देहभान विसरून ते या दिंडीत नाचत होते.पावसाच्या कोसळणाऱ्या सरीतही हे वारकरी नाचण्यात दंग झाले होते.पावसाची तमा न बाळगता विठ्ठलाच्या भक्तीत एकरुप झाले होते.