
वैभववाडी : जिल्हयातील इतर रेल्वेस्थानकांप्रमाणे वैभववाडी रेल्वे स्थानकांचे देखील सुशोभिकरण होणार आहे.याशिवाय येथील विविध समस्या देखील सोडविल्या जातील असे मत आमदार नितेश राणे यांनी येथे व्यक्त केले. येथील रेल्वेस्थानकातील पादचारी उड्डाण पुलांचे भुमिपुजन आमदार श्री.राणेच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, सुधीर नकाशे, किशोर जैतापकर, सज्जन रावराणे,रवींद्र कांबळे, सचिन देसाई, नेहा माईणकर, प्राची तावडे, शारदा कांबळे, प्रदीप जैतापकर आदी उपस्थित होते. आमदार श्री.राणे म्हणाले रेल्वे स्थानकातील विविध समस्या,जाणवत असलेल्या गैरसोयी प्रवाशांनी मांडल्याच पाहीजेत.प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे.
येथील स्थानकात विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली, कुडाळ ,सावंतवाडी रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करून दाखवले. वैभववाडी रेल्वे स्थानकांचे काम न झाल्याने लोकप्रतिनिधींना अनेक आरोपांना सामोरे जावे लागले. या रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण देखील लवकरच होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. खासदार नारायण राणे यांच्यामुळेच रेल्वेचे प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यांच्यामुळेच या पुलाला मंजुरी मिळाली आहे. मार्च 2025 ला प्रवाशांच्या सेवेसाठी हा पादचारी पुल खुला असेल. प्रत्येक नागरिकांनी, प्रवाशांनी थोडा संयम ठेवला पाहिजे. रेल्वे विभागाचे जाळे खूप मोठे आहे. विकास कामे ही सतत पाठपुरावा व वजनदार लोकप्रतिनिधीमुळे होत असतात. या रेल्वे स्टेशनचे सर्वच प्रश्न सुटलेत असे मानणाऱ्यापैकी आम्ही नाहीत. परंतु दिसत असणारा विकासात्मक बदल याही गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजेत असं मत राणे यांनी व्यक्त केले.