
कणकवली : नारायण राणे आज ज्या भाजप पक्षात आहेत, तो पक्ष घडविण्याचे काम स्व. प्रमोद महाजन यांनी केले होते. त्याच प्रमोद महाजनांचे प्रकाश महाजन हे ज्येष्ठ बंधू आहेत, एवढे भान ठेवले असते तर नारायण राणेंचीही वैचारिक प्रगल्भता दिसली असती, अशी टीका उबाठा शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
नाईक म्हणाले, नारायण राणे यांना आपल्या मुलावर प्रकाश महाजन यांच्यासारख्या वयस्कर नेत्याने केलेली टीका झोंबली. नारायण राणे, नीतेश राणे हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, यात दुमत नाही. पण, राणेंनी निवडून येण्यासाठी किती पक्ष बदलले? नारायण राणे ज्या ज्या पक्षात होते त्या - त्या पक्षांवर त्यांच्या चिरंजीवाने वेळोवेळी कशी टीका केली आहे, हे देखील राणेंनी स्वत: बघावे. याच राणेंना कॉग्रेस प्रवेशानंतर सोनिया गांधी यांनी राज्यात मंत्री करतानाच त्यांच्या मुलाला खासदारही केले होते. तरीही राणेंचे चिरंजीव वयाचे भान न ठेवता सोनिया गांधी यांच्यावर टीका करत असतात. अगदी ज्या बाळासाहेबांनी राणेंना घडवले त्यांच्यासह उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यावरही राणेंचे चिरंजीव टिका करत असतात. तर हेच राणे कॉग्रेसमध्ये होते, तेव्हा त्यांचे चिरंजीव देवेंद्र फडणवीस यांच्यावरही कशी टीका करत होते, हे जनतेला माहीत आहे. मग, त्यावेळी राणेंना आपल्या चिरंजीवांची प्रगल्भता दिसली नव्हती का? असेही नाईक म्हणाले.
राणेंचे चिरंजीव कुणाही ज्येष्ठ नेत्यांवर टीका करतात. पण, त्यांच्यावर टीका होते, त्यावेळी आपण जनतेमधून निवडून आल्याचे राणे सांगतात. कुणी टीका केली की मारण्याची धमकी द्यायची, हे योग्य नव्हे. राणे व त्यांच्या चिरंजीवांनी आपण लोकप्रतिनिधी आहोत, याची जाणिव ठेवावी, असेही नाईक यांनी म्हटले आहे.