वैभव नाईकांनी किती कोकणी माणसांना रोजगार दिला ते जाहीर करावे : दादा साईल

Edited by:
Published on: September 05, 2023 11:28 AM
views 95  views

कुडाळ : भाजपा हा भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील कार्यकर्ते असणारा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित असणारा आणि आता त्याचे देखील अस्तित्व नाही, ज्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर कोणी ओळखत नाही अशा उबाठा गटाच्या आमदारांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर टीका करू नये. महाराष्ट्राच्या विधानसभेचे सुरक्षा रक्षक देखील ज्यांना ओळखत नाहीत अशा स्वतःचे अस्तित्व नसलेल्यांनी दुसऱ्यांना सल्ले देऊ नये अशी टीका भाजप ओरोस मंडळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी आमदार वैभव नाईक यांना प्रत्युत्तर देताना केली आहे.

आमदार वैभव नाईक यांनी भाजपवर टीका करताना  सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीयांना भाजप पदे देऊन कोकणवासीयांना पद्दपार करण्याचा डाव रचला असल्याची टीका आमदार वैभव नाईक यांनी केली होती. त्याला भाजपा ओरोस मंडळ तालुकाध्यक्ष दादासाहेब यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दादा साईल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की ''एक भारत श्रेष्ठ भारत' या तत्त्वावर चालणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. भारतीय जनता पार्टी कोणत्याही कार्यकर्त्यांमध्ये जात, पंथ, धर्म, वेश आणि देश यावरून भेदभाव करत नाही. कोकणातील काही नागरिक भारताच्या अन्य राज्यांमध्ये जाऊन आपला व्यवसाय आणि नोकरी करत असतात. त्यांना देखील त्या त्या ठिकाणी असाच सन्मान दिला जातो. त्यामुळे कोकणी माणसाचा सन्मानाला ठेच पोहोचण्याचा किंवा हद्दपार करण्याचा प्रश्नच येत नाही. असे दादासाहेब यांनी म्हटले आहे. 

तर याच उबाठा गटाच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून प्रत्येकवेळी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी होऊ घातलेल्या सीवर्ल्ड प्रकल्प, देवली एमआयडीसी, ग्रीन रिफायनरी इत्यादी रोजगार निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना विरोध करून कोकणी माणसाचा स्वतःचा हक्काचा रोजगार हिरावून घेतला आहे. त्यामुळे त्यांनी अगोदर रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत. यांचा पक्ष कोकणी माणसाच्या रोजगार निर्मितीसाठी नसून स्वतःची पोटे भरण्यासाठी आहे याची सगळ्या  कोकणी जनतेला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे हे स्वतःच्या हक्काच्या शिवसेना पक्षातून हद्दपार झालेच आहेत आता येणाऱ्या विधानसभेतून पण यांचा उबाठा गट हद्दपार होणार आहे. त्यामुळे वैभव नाईक यांनी इतरांना सल्ले देण्यापेक्षा आत्मचिंतन करावे असा टोला भारतीय जनता पार्टीचे ओरोस मंडळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी लगावला आहे..