वैभव नाईक फक्त 'चर्चावाले' आमदार !

भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल यांचा टोला
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 06, 2023 12:20 PM
views 118  views

कुडाळ : एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना फसव्या म्हणून ओरड मारायची आणि दुसरीकडे त्याच योजनांचे कॅम्प लावून लोकांना लाभ मिळवून देण्याचा आव आणायचा. कुडाळ मालवणचे नाकाम आमदार वैभव नाईक यांनी आपल्या मतदारसंघात होऊ दे चर्चा या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. खरं म्हणजे गेल्या दहा वर्षात त्यापैकी आठ वर्षे वैभव नाईक हे सत्तेतले आमदार होते. तरीपण यांना आपल्या मतदारसंघात आमदार विकास निधी पलीकडे एकही रुपया आणता आला नाही हा खरा चर्चेचा विषय आहे. मतदारसंघातील इतर विकास प्रकल्प वैभव नाईक यांच्या ध्यानीमनी देखील नाही. त्यामुळे त्यांच्याकडनं सर्वसामान्य जनतेने अपेक्षा तरी काय ठेवायची? त्यामुळेच त्यांना होऊ दे चर्चा यासारख्या कार्यक्रमांची गरज भासली असावी, असा टोला भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी लगावला. 

वैभव नाईक यांनी होऊ दे चर्चा यासारखे कार्यक्रम करण्यापेक्षा आपल्या तालुक्यांच्या आमसभा घेऊन दाखवावेत मग खरी चर्चा काय होते याची प्रचिती त्यांना येऊ शकेल. केंद्र आणि राज्य सरकारवर आरोप करण्यापेक्षा मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी इथल्या सर्वसामान्य जनता विद्यार्थी, बेरोजगार युवक, युवती आणि नागरिकांच्या आरोग्य शिक्षण रोजगार याबाबतीत काय केले त्याची चर्चा करावी. 

होऊ द्या चर्चा कार्यक्रमात आमदार वैभव नाईक यांचा सर्व शासकीय योजना फसव्या असल्याचा आरोप करून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना मोदी साहेबांच्या माध्यमातून  विविध योजना उपक्रम ज्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार, आभाकार्ड यांसारखे उपक्रमांचे कॅम्प लावून त्याची उद्घाटन करताना वैभव नाईक यांना चर्चा करावीशी का वाटली नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.