
मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. आमदार वैभव नाईक यांच्यासह संतप्त शिवप्रेमींनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देत तोडफोड करत निषेध केला.
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज दुपारी वादळी वारे, मुसळधार पावसात कोसळण्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून याला नौदल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग हेच जबाबदार असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला. पुतळा कोसळल्याने भावना दुखावलेल्या संतप्त शिवप्रेमींनी मेढा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयास धडक दिली. यावेळी बांधकाम विभागाकडून बोगस कामे होत असल्याचा आरोप करत आमदार वैभव नाईक यांच्यासह संतप्त शिवप्रेमींनी कार्यालयाची तोडफोड करत तीव्र निषेध केला.