
कुडाळ : आमदार वैभव नाईक यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे तानाजी पालव यांनी आपल्या युवा सेना तालुका सरचिटणीस पदाचा राजीनामा देत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला "जय महाराष्ट्र"केला आहे. कुडाळ तालुक्यात सद्यस्थितीत राजीनामा सत्र सुरू असून मागील काही दिवसांपासून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर आता परत एकदा उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांना धक्का देत तानाजी पालव यांनी आपला राजीनामा दिला आहे.
दिलेल्या राजीनाम्यात असे म्हटले आहे कि, मी युवासेना तालुका चिटणीस, कुडाळ तालुका या पदावर कार्यरत असून अगदी शालेय शिक्षणापासून गेली १६ वर्षे शिवसेना पक्षामध्ये सक्रिय काम करत आहे. ज्यावेळी पक्षाचा झेंडा हातात घ्यायला जनमाणसांस भीती होती त्यावेळेपासून ते आज पर्यंत पक्षाचे प्रामाणिक काम केले. तत्कालीन जिल्हाप्रमुख वैभवजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम, सभा, आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. आ. वैभवजी नाईक यांच्या मुळेच मी राजकारणात नावारूपास आलो.
परंतु गेल्या ६ ते ७ वर्षात पक्षात अनेकांचे प्रवेश झाले, पंचायत समिती निवडणुकीत शब्द देऊन २ दिवस अगोदर तिकीट कापले गेले त्या परिस्थितीतही पक्षाशी प्रामाणिक राहिलो. तरीही विकासकामांमध्ये स्वपक्षातील लोकांनी घातलेला खोडा, ग्रामपंचायत निवडणुकीत स्वपक्षाकडून झालेला विरोध व त्यांना तालुकास्तरीय नेत्याकडून दिली गेलेली अंतर्गत साथ तसेच या सर्व प्रकाराबाबत वरिष्ठ नेत्यांकडून जाणीवपूर्वक केलेला दुर्लक्ष या सर्व कारणांमुळे मी माझ्या युवासेना तालुका चिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. असे राजीनाम्यात म्हटले आहे.