वैभव नाईकच लाचार..!

कोकणी माणसाच्या स्वाभिमानाला ललकारू नका पैसे 'उबाठा'नेच वाटले : मंत्री दीपक केसरकर
Edited by:
Published on: May 06, 2024 13:50 PM
views 313  views

सावंतवाडी : भाजपनं पैसै वाटले असं म्हणणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी त्यांना रोखले का नाही ? माझ्या निवडणूकीत मी कधीही पैसे वाटले नाहीत. उलट असे प्रकार रोखण्याच काम आम्ही केलं आहे. लोक म्हणतात उबाठानेच पैसे वाटले. आ. नाईक यांनी अशाप्रकारे बोलून कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. लाचारी आमच्या रक्तात नाही. कोकणी माणसाच्या स्वाभिमान ललकारू नका, अन्यथा विधानसभेत तुमच्या मतदारसंघात याव‌ लागेल. मागच्यावेळी अर्ज बाद झाला म्हणून वाचला असा सणसणीत इशारा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देत वैभव नाईकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

ते म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. ए, बी.सी कॅटॅगरी पैसे वाटले असं आ. नाईक यांनी म्हटलंय. कुणी पैसे वाटले याची कल्पना नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी एकलाही पैसै वाटले नाहीत. जर पैसे वाटले गेले तर वैभव नाईक यांनी ते रोखल का नाही ? उलट उबाठा शिवसेनेनेच पैसै वाटले असं लोक सांगत आहेत असा हल्लाबोल दीपक केसरकर यांनी केला.

दरम्यान, वैभव नाईक म्हणालेत की आमदार पन्नास खोके घेऊन लाचार झाले. पण, कोकणी माणूस लाचार होणार नाही. वैभव नाईकांना सांगू इच्छितो आम्ही लाचार नाही. मातोश्री बाहेर तासनतास उभा रहाणारा मी नाही. कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. कोकणी माणसाच्या स्वाभिमानाला ललकारू नका, कुणाला बदनाम करायची हिंमत करू नका. अन्यथा सगळं बाहेर काढावं लागेल असा गर्भीत इशारा दिला.  मागच्यावेळी समोरील उमेदवाराचा अर्ज बाद झाला अन्यथा आज चित्र वेगळं असतं असं केसरकर म्हणाले. वैभव नाईक यांना लाचारीची सवय आहे‌. मातोश्री, वर्षा बाहेर उभे राहणारे आ. नाईक आहेत. मला ही लाचारी पटत नाही. आमदार हे लोकांच प्रतिनिधित्व करतात. नारायण राणे विरोधी पक्षात असतानाही त्यांनी आमदार म्हणून सन्मानाची वागणूक आम्हाला दिली. आमच्यातील संघर्ष हा वैचारीक होता. तर वैभव नाईक आज आमच्यासोबत असू शकले असते. पण, त्यांच्या व्यक्तिगत अडचणींमुळे ते एकनाथ शिंदेंसोबत आले नाहीत‌ असा गौप्यस्फोट केसरकरांनी केला. तर उद्धव ठाकरे यांना सांगूनच आम्ही निघालो. आम्ही लाचारी सहन करणारे नाही. वैभव नाईक यांनी आमच्यावर बोलू नये, आदित्य ठाकरेंनीही बोलू नये. मी साईबाबांचा भक्त आहे. त्यामुळे कुणाबद्दल तुम्ही बोलता याची नैतिकता बाळगा. मी एक रूपया सुद्धा घेतलेला नाही. आमची लढाई स्वाभिमानाची लढाई स्वाभिमानानं लढली आहे. पैसै उबाठान वाटले असही बोललं जातं आहे. पैसे वाटले जात होते तर वैभव नाईक यांनी का रोखल नाही ? असा सवाल करत दीपक केसरकर यांनी वैभव नाईक यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.