
सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीमध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांकडून पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचे भरण, पोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. परंतु, अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेला असल्याचे आढळून येते. त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे.
त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये वाचन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. आज रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे सामूहिक वाचन केले. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पंधरवड्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन,वाचन कौशल्य कार्यशाळा, पुस्तक वाचन, परीक्षण, कथन, लेखक व विद्यार्थी यांच्यामधील संवाद ,
ग्रंथालय भेट, प्रसिद्ध पुस्तकांचा परिचय, माध्यमांतर, माझे प्रेरणादायी पुस्तक, सुविचार दर्शन, परिसरातील नामवंत लेखिकांचा परिचय,असे विविध उपक्रम तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचे भरण पोषण होण्यासाठी घेण्यात येणार आहेत. यामध्ये उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी कळविले आहे.