
नवी दिल्ली : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या यूपीएससी परीक्षेतील गैरव्यवहाराची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू असतानाच आता केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिला आहे. मनोज सोनी यांचा कार्यकाळ २०२९ पर्यंत होता. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला असून त्याचा पूजा खेडकर प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला बोगस अंपगत्व आणि ओबीसी नॉनक्रिमीलेयरचे प्रमाणपत्र देऊन परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच त्यांनी नाव आणि इतर माहिती बदलून अनेकवेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याचा आरोप केला जात आहे.
मनोज सोनी हे २०१७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले. १६ मे २०२३ रोजी त्यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडूनच नागरी सेवा परीक्षा घेण्यात येते.