कुडाळ नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध नगरसेवकांनी केला निषेध
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 02, 2022 11:32 AM
views 365  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या प्रशासनातील अधिकारी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये शासनाची आलेली परिपत्रके तसेच न्यायालयीन बाबत आलेली पत्रे का ठेवत नाहीत? यावरून नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ होऊन सर्व नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला याबाबतचा ठराव भाजपा नगरसेविका संध्या तेरसे यांनी मांडला.

कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा आफरीन करोल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकारी सूरज कांबळे उपस्थित होते. या सभेमध्ये प्रामुख्याने प्रशासनाचा ढिसाळ कारभार याबाबत नगरसेविका संध्या तेरसे यांनी निषेध व्यक्त केला. नगरपंचायतीच्या संदर्भातील न्यायालयीन दावे जे सुरू आहेत, त्याबाबत आलेली पत्रे तसेच प्रशासकीय विविध विभागातून आलेली पत्रे ही सर्वसाधारण सभेपुढे ठेवली पाहिजेत, जेणेकरून त्यावर चर्चा होऊन निर्णय घेणे सोपे होईल. मात्र प्रशासनातील अधिकारी ही पत्रे सभागृहासमोर ठेवत नाहीत. त्यामुळे या प्रशासनातील अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा निषेध व्यक्त केला.  या निषेधाला सर्वच नगरसेवकांनी सहमती दर्शवली.

 हिंदू कॉलनी येथील ग्रामपंचायत काळात बांधलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या जागे संदर्भातील न्यायालयीन पत्र आले होते. मात्र ते सभागृहासमोर ठेवण्यात आले नाही. आता याबाबत निर्णय घेऊन न्यायालयात नगरपंचायतीची बाजू मांडण्यासाठी पुढील कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका संध्या तेरसे यांनी केली.


सेल्फी पाॅईंट हटवू देणार नाही

या सभेवेळी कुडाळ शहरांमध्ये एस. टी. बस स्थानकाच्या समोर सेल्फी पॉईंट नगरपंचायतीमार्फत उभारण्यात आला आहे. मात्र हा सेल्फी पॉईंट काढण्यात यावा, अशा आशयाचे पत्र एस. टी. बस प्रशासनाकडून नगरपंचायतीला देण्यात आले आहे. हे पत्रसुद्धा सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आले नाही. याबाबत भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी जाब विचारला असता नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी मौन बाळगले.

 एस. टी. प्रशासन कोणत्या अधिकारात आम्हाला सेल्फी पॉईंट हटविण्यात सांगत आहे. रुंदीकरणासाठी जमीन नगरपंचायतीला हस्तांतर झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट सुरक्षित जागी करण्यात आला आहे. तसेच याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता नगर अभियंता विशाल होडावडेकर यांनी सांगितले की, एस. टी. बस प्रशासनाच्या दोन इमारती बेकायदा आहेत. त्या अनधिकृत असल्याबाबत नोटीस दिल्यामुळे सेल्फी पॉईंट हटवण्याचे पत्र दिलेले आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सेल्फी पॉईंट आम्ही हटू देणार नाही, असा पवित्रा घेतला.


गेले सहा महिने एकच विषय

या सभेसमोर पुन्हा एकदा बाजारपेठेचा विषय आला.  यावर भाजपचे नगरसेवकाने सांगितले की, गेले सहा महिने विकासात्मक विषय कमी पण बाजारपेठेचे विषय प्रत्येक सभेसमोर ठेवलेला आहे एकदा बाजारपेठेचा निर्णय घेऊन टाका, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर आता रस्त्यालगत बसणाऱ्या व्यापाऱ्यांना चौकोन आखून देणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच यासंदर्भात उपविधी लवकरच करण्यात येईल, असे मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी सांगितले.


रास्त धान्य दुकान बंद करण्यासंदर्भात झाला विचारविनिमय

कुडाळ ग्रामपंचायत कालावधीपासून रास्त धान्य दुकान प्रशासनामार्फत चालवले जात आहे. मात्र आता हे रास्त धान्य दुकान तोट्यात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे हे रास्त धान्य दुकान बंद करण्यासंदर्भात सर्वसाधारण सभेसमोर विषय ठेवण्यात आला होता.  यावेळी या रास्त धान्य दुकानाची परिस्थिती सद्य:स्थितीत काय आहे? हे सांगण्यात आले. याबाबत भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी सांगितले की, या रास्त धान्य दुकानावर ६४१ शिधापत्रिका धारक आहेत. गेले अनेक वर्ष आपण त्यांना सेवा देत आहोत, जर हे बंद झाले तर अन्यत्र त्यांना शिधा घेण्यासाठी सांगितले जाणार आहे आणि कुडाळ शहरात दोन रास्त धान्य दुकान आहेत.  त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर शिधा धारक आहेत. त्यांच्यावर परिणाम होणार आहे. म्हणजेच पुन्हा या शिधा धारकांवर अन्याय होणार आहे. 'ना तोटा ना नफा' या तत्त्वावर ही सेवा देण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच नगरसेविका संध्या तेरसे यांनीसुद्धा हे दुकान सुरू ठेवावे, अशी मागणी केली. मात्र सत्ताधारी नगरसेवकांनी हे दुकान बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला पाहिजे, असे सांगितले. या दुकानामुळे नगरपंचायतीची बदनामी होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कुडाळ शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत चर्चा झाली. यामध्ये नगरसेवक अभिषेक गावडे यांनी नक्षत्र टॉवर येथे अनधिकृत बांधकाम करण्यात आले. मात्र त्याला फक्त दोनच नोटीसा देऊन प्रशासन का गप्प राहिले? असा सवाल उपस्थित केला. प्रशासनाच्या या कारभारामुळे शहरांमध्ये अनधिकृत बांधकामे वाढत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या सर्वसाधारण सभेमध्ये विकास कामांच्या ठरावांना मंजूरी देण्यात आली.