आगामी निवडणूका स्वबळावर लढावायची कार्यकर्त्यांची इच्छा : राजन तेली

Edited by: विनायक गावस
Published on: November 16, 2022 19:55 PM
views 257  views

सावंतवाडी : राज्यात झालेली बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती लक्षात घेता होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीमध्येही युती होईल का याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांची भावना जाणून घेतली असता स्वबळाचा नारा या ठिकाणी दिसून आला. भाजपचे कार्यकर्ते ॲक्टिव्ह मोडमध्ये असून त्यांनी जास्तीत जास्त ग्रामपंचायत जिंकण्याची तयारी केली आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना जिल्हाध्यक्ष या नात्याने वरिष्ठांच्या कानी घालणार आहे. मात्र, युती संदर्भात निर्णय प्रदेश पातळीवरच घेण्यात येईल अस मत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मळगाव येथील भगवती सभागृहात भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या मेळाव्यानंतर तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत यावेळी जिल्हा बँक संचालक  महेश सारंग, रवींद्र मडगावकर, तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवा उमेदवार चाचपणी सुरू असून प्रत्येक गावासाठी प्रभारी नेमण्यात आले आहेत. संबंधितावर आवश्यक ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूका होत असलेल्या तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतमध्ये विजय खेचून आणण्यासाठीच भाजपा मैदानात उतरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपा कार्यकर्त्यांकडून एकीकडे ग्रामपंचायतीची तयारी सुरू असतांना इतर पक्ष मात्र या प्रक्रियेत कुठेच  दिसत नाही. ज्याप्रमाणे खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत यश पाहायला मिळाले तसेच यश यापुढेही ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळेल. कार्यकर्त्यांना तयारीला लागा अशा सूचनाही देण्यात आल्या असून जास्तीत जास्त ठिकाणी उमेदवार निश्चिती ही करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यानुसार आवश्यक ते पाठबळ कार्यकर्त्यांना पक्षाकडून देण्यात येणार आहे.  दरम्यान, येत्या २६ नोव्हेंबर रोजी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महिला अध्यक्ष चित्रा वाघ जिल्हा दौऱ्यावर येत आहेत यावेळी कार्यकर्त्यांच्या भावनाही त्यांच्या कानावर घातल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.