ग्रामस्थांच्या रोषामुळे उपसरपंचांचा राजीनामा

Edited by: मनोज पवार
Published on: October 31, 2025 18:39 PM
views 127  views

दापोली : दापोली तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरुड येथील ग्रामपंचायतिमध्ये पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने तेथील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून ग्रामसभेत चिडलेल्या ग्रामस्थांच्या रोषामुळे  उपसरपंच यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

या संदर्भात भाजपचे तालुका सरचिटणीस व मुरुड गावचे ग्रामस्थ विवेक भावे यांनी माहिती देताना सांगितले कि,  मुरुड ग्रामपंचायतिच्या सरपंच सानिका नागवेकर यांनी एप्रिल 2025 मध्ये सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त असून उपसरपंच सुरेश तुपे हे या ग्रामपंचायतीचा कारभार पाहत होते. मात्र या ग्रामपंचायतीमध्ये कायस्वरूपी ग्रामसेवकच नसल्याने ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार ठप्प झाला आहे. मुरुडमधील पाणी योजनेचा पंप नादुरुस्त झाल्याने अनेक दिवस  गावचा पाणीपुरवठा बंद झाला असून पंप दुरुस्त करण्यासाठी लागणाऱ्या पत्रावर सही करण्यासाठीहि ग्रामसेवक उपलब्ध होत नाही. विकास कामांची पत्रे जिल्हा परिषद बांधकाम विभागाला देण्यासाठी ग्रामसेवकच गावात येत नाहीत.  ऐन दिवाळीत या गावातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागले. अनेक वेळा पंचायत समितीकडे पत्रव्यवहार करूनही कायमस्वरूपी ग्रामसेवक या ग्रामपंचायतीला उपलब्ध करून दिला जात नाही. जेव्हा ग्रामपंचायतिची मासिक सभा असेल किंवा ग्रामसभा असेल  तेव्हा पंचायत समितीकडून एखादा ग्रामसेवक पाठविला जातो. त्यामुळे या सभांचे इतिवृत्तहि वेळेवर लिहिले जात नाहीत. त्यामुळे ग्रामसभेत गदारोळ होतो व उपसरपंच तसेच सदस्य यांना ग्रामस्थांच्या प्रश्नाना व रोशाला सामोरे जावे लागते त्यामुळे उपसरपंच सुरेश तुपे यांनीही त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. 

या सर्व प्रकारामुळे आज विवेक भावे व मुरुडचे ग्रामस्थ, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विराज खोत हे आज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंडलिक यांना भेटण्यासाठी आले होते मात्र मंडलिक रजेवर असल्याने त्यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी मर्चंडे यांची भेट घेवून त्यांना सर्व माहिती दिली. आता सोमवारी गटविकास अधिकारी मंडलिक हजर झाल्यावरच या प्रश्नांवर मार्ग निघेल असे भावे यांनी सांगितले. 

मुरुड येथील बहुचर्चित सा रीसाँर्ट  प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवक यांना चौकशीला सामोरे जावे लागले होते त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये काम करण्यास कोणीही ग्रामसेवक तयारच होत नसल्याने हि परिस्थिती उद्भवली आहे.