अवकाळी पावसाचा बागायतदारांना मोठा फटका

Edited by:
Published on: May 25, 2025 12:26 PM
views 83  views

देवगड : देवगडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला असून त्यामुळे आंबा, काजू, फणस, कोकम आणि जांभूळ या फळांवर झाला असून  या फळांना किडजन्य  रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. हा सर्व रानमेवा या अवकाळी पावसामुळे पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे, तर आंबा आणि काजू पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. देवगडमध्ये कोकम पीक धोक्यात आले आहे. परिपक्व झालेले सुमारे ४२ हेक्टर क्षेत्रातील कोकम अवकाळी पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. येथील हे एक महत्त्वाचे फळ असून, याला ‘आमसूल’ किंवा ‘रातांबा’ असेही म्हणतात. सरबत, सोलकढी आणि आगळ बनवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. 

देवगड येथील हापूस आंबा उत्पादकांना दुहेरी धक्का

या हंगामात बदलत्या हवामानाचा फटका आंबा बागायतदारांना बसला आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. किनारी भागातील काही बागायतदारांनी आंब्यावर प्रक्रिया करण्यासाठी तो विकल्यामुळे त्यांना थोडा फायदा होण्याची अपेक्षा आहे, परंतु सह्याद्रीच्या पट्ट्यातील नुकसान अधिक आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

या अवकाळी पावसामुळे पारंपरिक काजू पीक धोक्यात आले आहे

गेल्या दोन वर्षांपासून हवामानातील बदलांमुळे जांभूळ पिकाची स्थिती खालावली होती. यंदाच्या हंगामातही बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने जांभूळ पीक अल्प प्रमाणात आले.यामुळे जांभळाला ५०० रुपये प्रति किलो असा विक्रमी भाव मिळाला.हंगामपूर्व पावसामुळे फळबागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. व शेतकरी हवालदिल झाला आहे.