अवकाळी पावसाने बांदा परिसराला झोडपले

Edited by:
Published on: May 11, 2024 13:51 PM
views 228  views

बांदा : बांदा शहर व परिसराला आज सायंकाळी विजांच्या गडगडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी वर्गासह सर्वांचीच तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने आंबा, काजू बागायतदार मात्र हवालदिल झालेत. अवकाळीच्या पहिल्याच दिवशी वीज पुरवठा खंडित झाला. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. आज दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी वीज चमकण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ६ वाजता मुसळधार अवकाळी पावसास प्रारंभ झाला. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी तसेच व्यापारी वर्गाची तारांबळ उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत अवकाळी पावसाची झोड सुरूच होती. बांदा शहरातील कट्टा कॉर्नर येथे सखल भागात पावसाचे पाणी साठल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना त्रास होत होता.