
दोडामार्ग : दोडामार्ग तहसील कार्यालय परिसरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अस्वच्छतेमुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या लोकांना कचरा, दुर्गंधी, वाढलेली झाडी आणि अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या वाहनांमुळे मार्ग काढणेही कठीण होत आहे. तहसील कार्यालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय ठिकाणी ही परिस्थिती निर्माण होणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक असल्याची टीका उबाठा युवासेनेने केली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत परिसरातील कचरा हटवून स्वच्छता न झाल्यास आणि पोलीस विभागातील जप्त गाड्या नियोजनबद्ध न लावल्यास तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर आंदोलन उभारण्याचा इशारा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
तहसील आवारात स्वच्छतेचा डोलारा पूर्णपणे कोसळलेला दिसत आहे. ठिकठिकाणी वाढलेली झुडपे, रस्त्यावर साचलेला कचरा आणि वापरात नसलेली पाण्याची टाकी ही कचरा साठवणुकीची जागा बनल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. दुसरीकडे, दोडामार्ग पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकीकडे लांबच लांब रांग लावली गेल्याने संपूर्ण आवार हा अस्वच्छ बनला आहे. नागरिकांच्या मते, या गाड्यांची योग्य मांडणी नसल्याने जागेचा वापर करणे कठीण बनले आहे. या सर्व गोंधळ आणि घाणीच्या साम्राज्यावर कठोर नाराजी व्यक्त करत उबाठा युवासेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसांत संपूर्ण स्वच्छता करून आवार नीटनेटकं न केल्यास तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवरच आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे म्हणाले, “तहसील कार्यालय हे नागरिकांच्या दैनंदिन कामांचे केंद्र आहे. येथेच प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणार असेल, तर सामान्य नागरिक कुठे न्याय मागणार? हे चित्र बदललेच पाहिजे.” या वेळी उपतालुकाप्रमुख संदेश राणे, सिद्धेश कासार, प्रदीप सावंत, समीर म्हावसकर आदी उपस्थिती होते. तहसीलदार राहुल गुरव व पोलिस उपनिरीक्षक आशिष भगत यांची भेट घेऊन परिसरातील अडचणींचा सविस्तर आढावा घेत ही परिस्थिती बदलावी अशी मागणी केली.

बांधकाम विभागाला सूचित करण्यात आले आहे. – तहसीलदार
तहसीलदार गुरव यांनी यावेळी सांगितले की, “परिसराच्या स्वच्छतेसाठी बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जप्त गाड्या सुव्यवस्थित लावण्याबाबत पोलीस विभागाकडेही निर्देश देणार आहोत.” यामुळे पुढील काही दिवसांत परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे; तथापि युवासेनाने आंदोलनाचा इशारा कायम ठेवला आहे.
तहसीलदार आवारातील शौचालय वापराविना...
दरम्यान, कसई–दोडामार्ग नगरपंचायतीकडून तहसील आवारात बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय अजूनही नागरिकांसाठी न उघडण्याचा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शासनाचा मोठा निधी खर्च करून उभारलेली सुविधा वापरात न आणणे हा निधीचा अपव्यय असून नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळण्याचे हे मोठे दुर्लक्ष असल्याचे युवासेनेने निदर्शनास आणले.पाण्याची योग्य व्यवस्था करून हे शौचालय तात्काळ सुरू करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. तहसील कार्यालय परिसरातील ही अस्वच्छ परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काळात नागरिकांच्या नाराजीची तीव्रता वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.










