
सिंधुदुर्ग : सरकारी नोकरी हा विषय दिवसेंदिवस कालबाह्य होत असून आधुनिक तंत्रज्ञान व खाजगीकरण यामुळे रोजगाराची समस्या निर्माण झालेली आहे. त्यावर भारत सरकारच्या माध्यमातून बेरोजगारांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी एम्. एस्. एम्. ई. मंञालया अंतर्गत रिटेल लोन, मुद्रा लोन, नारी शक्ती, स्टॅन्ड अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया अशा सुविधा द्वारे आर्थिक सहकार्य करण्यात येत असून यासाठी देशातील पाचव्या क्रमांकांची युनियन बॅक देशभरात जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेऊन नवीन उद्योजकांना प्रोत्साहित करत आहे असे प्रतिपादन युनियन बँकेचे कोल्हापूर विभागाचे असिस्टंट जनरल मॅनेजर शरणा बसवा यांनी केले. सरकारच्या सर्व योजनांची माहिती देण्यासाठी कोल्हापूर येथे बॅकेचा एम्. एस्. एम्. ई. लोन पाॅईंट कार्यरत आहे . कुडाळ एम्. आय्. डि. सी. असोसिएशन व युनियन बॅक कोल्हापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते.
असोसिएशनचे कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर यांनी आपल्या प्रास्ताविक संबोधतनात जिल्ह्यातील नव उद्योजकांना येणाऱ्या समस्या सविस्तर पणे मांडल्या. तसेच जिल्हा उद्योग केंद्र, एम्. एस्. एम्. ई. व बँका यांनी सुसंवाद ठेवून सकारात्मक विचार केल्यास या जिल्ह्यात छोट्या मोठ्या उद्योजकांना मदत होवू शकते. असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर यांनी बॅंकेचा कर्जपुरवठा व तारण याबाबतच्या शंका उपस्थित केल्या. याबाबत एम्. एस्. एम्. ई. लोन पाॅईंटचे सिनीयर मॅनेजर सचिन तलवार यांनी सविस्तर माहिती दिली. कुडाळ शाखेचे सिनीयर मॅनेजर अमित माजगावकर यांनी युनियन बॅक नव उद्योजकांना मदत करण्यासाठी उत्सुक असुन ज्याना भारत सरकारच्या या योजनांचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी शाखेत संपर्क करण्याचे आवाहन केले.
यावेळी नव उद्योजिका व फॅशन डिझायनर प्रिया पार्सेकर हिने आपल्याला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी युनियन बँकने सर्वोतोपरी सहकार्य केले असून छोटा मोठा उद्योग करणाऱ्या महिलांना पुढे येवून या संधीचा लाभ घेतला पाहिजे असे मत मांडले. यावेळी दोन स्थानिक नव उद्योजकांना असिस्टंट जनरल मॅनेजर यांच्या हस्ते एम्. एस्. एम्. ई अंतर्गत प्रत्येकी पन्नास लाख रूपये मंजूर झालेली मंजूरी पञ प्रदान करण्यात आली.
या कार्यशाळेसाठी असोसिएशनचे सल्लागार हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, तसेच उद्योजककृष्णा जोशी, आशुतोष शुक्ला, प्रथमेश परब, भिवा परब, रामचंद्र पालकर, कमलेश चव्हाण, यश चव्हाण, पुरूषोत्तम घोगळे आदी उपस्थित होते.