महावितरणकडून गणेशोत्सव कालावधीत अखंडित वीज पुरवठा व्हावा..!

जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
Edited by: विनायक गावस
Published on: September 14, 2023 17:12 PM
views 126  views

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील वाढत्या वीज संबंधित तक्रारींची दखल घेऊन वीज ग्राहकांना योग्य आणि सुरळीत वीज पुरवठा व्हावा, त्याचप्रमाणे वीज संबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यरत असून आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 1.00 वाजता वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग व सावंतवाडी शाखेच्या वतीने महावितरण सावंतवाडी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांना गणेशोत्सव कालावधीत विजेच्या कोणत्याही तक्रारी येऊ नये त्याचप्रमाणे वीज ग्राहकांना सुरळीत, अखंडित वीज पुरवठा करण्या संबंधीचे निवेदन देण्यात आले. यावेळी वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, समन्वयक गणेश तथा बाळ बोर्डेकर, सदस्य श्री.पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुक्यात वीज ग्राहकांच्या अनेक समस्या असून वीज ग्राहकांना महावितरण कडून गेली अनेक वर्षे जुन्या असलेल्या वीज ट्रान्सफॉर्मर मधून वीज पुरवठा केला जात आहे. वाढती विजेची मागणी लक्षात घेता जुन्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता कमी असल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांचे शेती पंप आणि घरगुती ग्राहकांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे नादुरुस्त होतात त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे उपकार्यकारी अभियंता यांच्या लक्षात आणून दिले.

सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांमधून वीज ग्राहक संघटनेकडे महावितरण कडून नवीन ट्रान्सफॉर्मर बसून मिळावेत, विजेच्या तारांना लागणारी झाडी तोडून मिळावी, गावात प्रत्येकी एक वायरमन मिळावा, सहाय्यक अभियंताकडून उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांकडे होत असलेला दुर्लक्ष अशा अनेक समस्या उपकार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांच्याकडे मांडण्यात आल्या. यावेळी चराठा येथे गेली 10 वर्षे मागणी करूनही नवीन ट्रान्सफॉर्मर न दिल्याने उद्भवणारी समस्या आज तात्काळ पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री.चव्हाण यांनी दिले. त्याचबरोबर गणेशोत्सव जवळ आल्याने अनेक गणेश शाळांमधून गणेश मुर्त्या घडविण्याचे काम सुरू असल्याने या कालावधीत गणेशोत्सव संपेपर्यंत वीज वितरण सुरळीत व्हावे खंडित केले जाऊ नये यासाठीही सूचना करण्यात आली. गणेशोत्सवाची तयारी सुरू असल्याने गणेशोत्सव संपल्यानंतर 29 सप्टेंबर रोजी माडखोल, देवसु दानोली, पारपोली, आदी विभागात, दि. 30 सप्टेंबर रोजी मळगाव, तळवडे, निरवडे आदी गावांमध्ये त्याचबरोबर दि.1 ऑक्टोबर रोजी कोनशी, दाभिल, ओटवणे आदी बांदा विभागातील गावांमध्ये वीज तारांना लागणाऱ्या झाडांची छाटणी करण्यासाठी वीज वितरणच्या कंत्राटदाराची गाडी पाठविण्याचे आश्वासन वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना उपकार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांनी दिले.

यावेळी वीज ग्राहक संघटनेचे सदस्य सिद्धेश तेंडुलकर, समीर शिंदे, तारकेश सावंत, निवृत्त वन अधिकारी सुभाष पुराणिक, सुरज खान, संतोष शिरोडकर आदी उपस्थित होते.