
सावंतवाडी : दुचाकी अपघातात गंभीर जखमी होऊन गोवा बांबुळी येथे उपचार सुरु असलेल्या न्हावेली पार्सेकरवाडी येथील भुषण उदय पार्सेकर या २४ वर्षीय युवकाचे शुक्रवारी सकाळी निधन झाले.मंगळवारी रात्री न्हावेली नागझरवाडी येथे त्याच्या दुचाकीचा अपघात झाला होता.
भुषण हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने गोवा येथून येत असतांना ताबा सुटून रस्त्याच्या कडेला कोसळला होता. तेथील ब्रीजला त्यांचे डोके आदळल्याने गंभीर दुखापत झाली होती. हा अपघात मंगळवारी १९ रोजी रात्रौ आठ वाजता न्हावेली नागझरवाडी येथे घडला होता. अपघातानंतर त्याला निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.
मात्र, डोक्याला गंभीर दुखापत असल्याने अधिक उपचाराकरिता धारगळ रेडकर हाॅस्पिटल व तेथून गोवा मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले होते. त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अपघातानंतर तो कोमात होता. दरम्यान उपचाराचा साथ देत असतांनाच अचानक शुक्रवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. भुषण हा मनमिळाऊ युवक होता गावात त्याचा मोठा मित्रपरिवार होतो. त्याला भजनाची व संगीताची आवड होती. भजन क्षेत्रामध्ये आपल्या सुमधुर आवाजाने त्याने आपले नाव केले होते.त्याच्या अशा अचानक एक्झिटने न्हावेली गावात व तसेच मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. शुक्रवारी सायंकाळी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात न्हावेली येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई वडील व एक भाऊ आहे. भजनी बुवा तसेच फॅब्रिकेशन व्यवसायिक उदय पार्सेकर यांचा तो मुलगा होय.