अनधिकृत वाळू उत्खनन ; 24 परप्रांतीय कामगारांवर गुन्हा

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 31, 2024 14:19 PM
views 219  views

मालवण : कर्ली खाडी पात्रात काळसे बागवाडी येथे अनधिकृत वाळू उत्खनन करत असलेल्या पाच होड्या ग्रामस्थांनी पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिल्या. गुरुवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, या अनधिकृत वाळू उत्खनन  प्रकरणी आंबेरी मंडळ अधिकारी यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शासनाच्या मालकीच्या वाळूची चोरी प्रकरणी संदेश राधाकृष्ण मठकर रा. वालावल कुडाळ, योगेश प्रभाकर करंगुटकर रा. काळसे बागवाडी मालवण, गणपत बाबाजी जावकर रा. काळसे बागवाडी या दोन होडी मालकांसह वाळू उपसा करणाऱ्या 24 परप्रांतीय कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण कारवाई दरम्यान महसूल प्रशासनाने एकूण पाच वाळू उपसा होड्या व होड्यामधील 22 ब्रास वाळू ताब्यात घेत जप्त केली आहे. तीन होड्या मधील वाळू कामगार पळून गेल्याने त्या कामगार तसेच होडी मालकांचा शोध सूरू असल्याचे पोलीस व महसूल प्रशासनाने माहिती देताना सांगितले आहे. 

कर्ली खाडी पात्रातील या होणाऱ्या अनधिकृत वाळू उत्खनन बाबत प्रशासनास वारंवार सांगूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अनधिकृत वाळू उत्खननात  मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचा परिणाम म्हणून खाडी किनारी भागाची धूप होऊन किनाऱ्यावरील माड बागायतीचे नुकसान वाढत आहे. शेतकरी बागायतदार ग्रामस्थ यामुळे त्रस्त बनले होते. तसेच काही ठिकाणी वाळू उत्खनन बंदी असलेल्या क्षेत्रातही वाळू उपसा सूरू असल्याचा आरोप ग्रामस्थ यांनी केला आहे.