परप्रांतीयांकडून आंबोलीत अनधिकृत बांधकाम

जमीन व्यवहाराविरोधात स्थानिक आक्रमक
Edited by: विनायक गांवस
Published on: February 07, 2024 09:15 AM
views 423  views

सावंतवाडी : आंबोलीत परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात हॉटेल, इमारतींची अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. ही अनधिकृत बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी सरपंच सावित्री पालेकर आणि ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याचप्रमाणे प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना देखील निवेदन सादर करत लक्ष वेधलं आहे.

यात कबुलायतदार गावंकर जमीन प्रश्न अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ठ व प्रलंबीत असतानाही उपरोक्त जमीनीवर अनाधिकृत अतिक्रमणे करून काही बांधकामे पुर्णत्वास आणलेली आहेत. काही सध्या चालु आहेत. कबुलायतदार गावंकर सद्य महाराष्ट्र शासन जमीन पुर्वीपासून कसत असणा-या मुळ रहिवासी शेतक-यांना योग्य त्या समप्रमाणात वाटप करण्याचे निर्देश महसुल विभागाने शासन निर्णयानुसार हल्लीच दिलेले आहेत. याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर चालु आहे. असं असताना आंबोली हे थंड हवेचे पर्यटन स्थळ असल्यामुळे व येथील जमीनीवर भांडवलशाही लोकांचा डोळा असल्यामुळे परगावचे लोक काही ठरावीक लालची तसेच अशिक्षीत ग्रामस्थांना व शासकीय यंत्रणेला हाताशी धरून अनधिकृतपणे मोठ्याप्रमाणात जमीनींचे खरेदी-विक्री व्यवहार राजरोसपणे करीत आहेत. त्यात बरीच मोठी अनाधिकृत आर्थिक उलाढालही होत आहे. या अनधिकृतपणे अतीक्रमणामुळे मोठ्याप्रमाणात जंगलतोड होत आहे. त्यामुळे येथील मुळ ग्रामस्थांना त्यांच्या दैनंदिन उपजिवीकेसाठी व राहण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नाही. शिवाय या भांडवलशाही लोकांकडून मुळ रहिवासी ग्रामस्थांना त्याचेच पारंपारिक वहिवाट व कसवटीच्या जागेत आज अडविले जात आहे. त्यांना "तुम्ही आमचे काय ते करून घ्या" अशी उत्तरे ही दिली जात आहेत. भविष्यात कदाचित ग्रामस्थांना मारहाण अथवा कोणताही अन्य त्रास होण्याची दाट शक्यताही नाकारता येणारी नाही असं येथील ग्रामस्थांच म्हणणं आहे. ‌

तर आंबोली कबुलायतदार गावंकर सद्य महाराष्ट्र शासन जमीनीवर झालेली सर्व अतीक्रमणे ही तातडीने कायमस्वरुपी हटविण्याची कारवाई व्हावी, तसे आदेश संबंधित सर्व कार्यालयांना व अधिका-यांना तातडीने देणेत यावेत. अनाधिकृतपणे झालेली सर्व अतिक्रमणे त्वरीत काढुन टाकुन जमीन मोकळी करुन ग्रामस्थांना परत त्याचे पारंपारिक वहिवाट व कसवटीसाठी उपलब्ध करुन न दिल्यास त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना कायदेशीर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा येथील अन्यायग्रस्त ग्रामस्थांनी दिला आहे.

दरम्यान, याबाबत निवेदन आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांना देण्यात आलं. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत, निधी गुरव, प्रकाश गुरव, राजाराम गुरव, बबन गावडे, बाळकृष्ण गावडे, शंकर गावडे, लाडू नाटलेकर, शीतल कविटकर, गोविंद जाधव, प्रकाश जाधव, काशीराम गावडे, रुपा गावडे, केशव जाधव, सुहासिनी गावडे, लक्ष्मी धुरी, सत्यवती गावडे, जिजाबाई गावडे, विश्वनाथ सुतार, शंकर गावडे, मोहन सावंत, रामा कविटकर, राकेश अमृस्कर आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत होते.