
वैभववाडी : उंबर्डे येथील ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिराच्या न्यासामध्ये गावातील बारा वाड्यांमधून प्रत्येकी एक अशा १२ नवीन सदस्यांचा समावेश करण्याचा निर्णय सहाय्यक धर्मादाय आयुक्त, कोल्हापूर यांनी दिला, अशी माहिती ग्रामस्थ परशुराम शिरसाट यांनी वैभववाडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सुर्यकांत मुद्रस, संतोष नारकर, चंद्रकांत तावडे, प्रभाकर पावसकर, विजय पांचाळ, विनोद पांचाळ, किशोर दळवी, वसंत सोनाळकर व गणेश पाटणकर आदी उपस्थित होते.
श्री शिरसाट म्हणाले,उंबर्डे महालक्ष्मी मंदिर हे साडेतीनशे वर्षांपासून गावातील वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक केंद्र आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ४,५०० असून एकूण १२ वाड्यांचा समावेश आहे. सर्व धार्मिक उत्सव गावातील सर्वांनी मिळून साजरे करण्याची परंपरा आजही टिकून आहे.मात्र अलीकडे स्थापन करण्यात आलेल्या मंदिर न्यासात केवळ ४९ ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यवाही पार पाडली गेली. तसेच अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार ही प्रमुख पदे वंशपरंपरेने कायम राहतील, अशी तरतूद घटनेत करण्यात आल्याने ग्रामस्थांनी याबद्दल आक्षेप घेतला.ग्रामस्थ परशुराम शिरसाट व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिर हे संपूर्ण गावाचे असल्याने प्रत्येक वाडीतून एक प्रतिनिधी न्यासात असावा, अशी मागणी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज करून केली होती.या प्रकरणाची दखल घेत १७ ऑक्टोबर रोजी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी न्यासात १२ वाड्यांतील प्रतिनिधींचा समावेश करण्याचा आदेश दिला. हा निर्णय गावातील सर्वसमावेशक प्रतिनिधित्वासाठी महत्त्वाचा ठरला आहे, असे श्री. शिरसाट आणि श्री. मुद्रस,श्री नारकर व श्री पावसकर यांनी सांगितले.
याबाबत न्यासाचे अध्यक्ष विजय दळवी म्हणाले, “गावसभेत सर्वसंमतीने न्यास स्थापन झाला होता. मात्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आम्ही बांधील असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.असे सांगितले.










