केसरकरांच्या सावंतवाडीत ठाकरे हाती धनुष्य घेणार ?

Edited by: विनायक गांवस
Published on: February 03, 2024 10:12 AM
views 687  views

सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सावंतवाडीत सभा घेत शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. उद्या रविवारी १२. ४५ वाजता त्यांच सावंतवाडी गांधी चौक येथे आगमन होणार असून मुख्यमंत्री शिंदेंचे निकटवर्तीय असलेल्या शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या होमपीचवर ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहीलं आहे.

पक्षातील अंतर्गत बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौरा करत आहेत. जिल्ह्यात मात्र सर्वप्रथम त्यांनी सावंतवाडीची निवड केली आहे. एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय असणाऱ्या केसरकरांच्या मतदारसंघातून ते या दौऱ्याला सुरूवात करणार आहे. त्यात ४० जणांना लोकसभेनंतर गाढणार असल्याचा इशारा उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तर जनसंवाद यात्रेत कोकण दौऱ्यात भाजपा 400 पार कशी जाते तेच बघतो अशी सिंहगर्जना करत ठाकरेंनी थेट भाजपाला आव्हान दिल आहे. त्याला मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिआव्हान देताना चारशेपेक्षा अधिक जागा कशा मिळतात ते बघाच. उद्धव ठाकरे यांच्या टोमणे बॉम्बला काही अर्थ नाही असा टोला त्यांनी लगावला होता. त्यामुळे केसरकरांच्या होम पीचवर उद्धव ठाकरे ठाकरी शैलीत कसा समाचार घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रविवारी सावंतवाडीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या जंगी स्वागताला शिवसैनिक सज्ज झाले आहेत. यातच मंत्री दीपक केसरकर यांनी देखील आपल्या विरूद्ध बोलल्यास त्याच पद्धतीने मुंबईत जाऊन उत्तर दिलं जाईल असा इशारा दिला आहे. केसरकर हे मुंबईचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ठाकरेंच्या सैनिकांनी केसरकरांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यामुळे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केसरकरांच्या सावंतवाडीत येऊन ठाकरी शैलीत कसा समाचार घेतात ? मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंमुळे विकासाला खीळ बसली असा आरोप करणाऱ्या दीपक केसरकरांवर काय बोलतात याकडे लक्ष लागलं आहे. एकंदरीतच, शांत, संयमी केसरकरांवर ठाकरे कोणता बाण उगारणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे.

ठाकरेंच्या शिवसैनिकांत उत्साह !

उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सावंतवाडीतील ठाकरेंची सेना सज्ज झाली आहे‌. उद्या दुपारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरें ते भव्य स्वागत करणार आहेत. हजारोंच्या संख्येने सैनिक यावेळी उपस्थित राहणार असा पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. शहरात होर्डिंग्ज, कमानी उभारल्या गेल्या आहेत‌. स्वतः खासदार विनायक राऊत यांनी देखील याचा शुक्रवारी भेट देत आढावा घेतला. संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, विधानसभा प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी या दौऱ्यासाठी कंबर कसली आहे. तर माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिसांनी देखील दक्षता घेतली आहे. डीवायएसपी व सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांनी सभास्थळी दाखल होत आढावा घेतला.