उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व शिकवू नये : नितेश राणे

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 28, 2025 18:47 PM
views 172  views

कणकवली : हिंदुत्वाच्या मुद्दयावरून उद्धव ठाकरे आमच्यावर सातत्याने टीका करत आहेत. पण भगव्याचा द्वेष करणाऱ्या आणि हिरव्याचे लांगुलचालन करणाऱ्या ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राज्यात, देशात हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सगळे एकाच धर्माचे कसे आढळतात ? आणि त्याविरोधात आम्ही आवाज उठवला तर आम्ही चुकीचे कसे ठरू शकतो ? असा सवाल पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

कणकवली येथे शुक्रवारी आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मंत्री राणे म्हणाले, भाजप पक्षाच्या झेंड्यातील हिरवा रंग देखील ठाकरेंना खुपतोय. तो काढावा अशी ते मागणी करत आजहेत. पण आमचा झेंडा कसा दिसावा याची चिंता त्यांनी करू नये. कारण आता भगवा आणि ठाकरे यांचा काहीही संबंध राहिलेला नाही.

मुख्यमंत्री होवून देखील ठाकरेंना संवैधानिक प्रक्रियांची माहिती नाही. विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवल्यावरून ते टीका करत आहेत. वस्तुतः जो कायदा देशाला तोच राज्याला लागू होतो. संसदेमध्ये विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने संसदेत विरोधी पक्ष नेता नव्हता. तशीच स्थिती राज्यात आहे. पण ठाकरेंना कायद्याचा कोणताही अभ्यास नाही.

देशात, राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व हिंसाचारामधील आरोपी हे एकाच धर्माचे आहेत. त्यामुळेच आम्ही त्या विरोधात आवाज उठवत आहोत. आम्हाला हिंदूत्व शिकवणाऱ्यांनी कधी त्या धर्मातील उन्मादींना संविधान शिकवलं आहे का? त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे का? हे आधी तपासून पहावं, असेही मंत्री राणे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाचा प्रभावी अर्थसंकल्प मांडला आहे. आमचं राज्य प्रगतशील राज्य म्हणून अधिक भक्कमपणे पुढे जाणार आहे. राज्य हिताचे मुद्दे तसेच विधेयक मांडण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. या उलट विरोधी पक्षात ताळमेळ राहिलेला नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून विरोधक अपयशी ठरले आहे. जनतेने आम्हाला जनमताचा मोठा कौल दिलाय. त्यामुळे आगामी पाच वर्षात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर दिसेल.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निधी खर्च करण्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी थोडा कंटाळा केला. योग्य नियोजन केले नाही. पण त्यांना आम्ही समज दिली आहे. ज्या गोष्टी चौकटीत बसत नव्हत्या. त्यामध्ये आम्ही सुधारणा करून निधी योग्य पद्धतीने खर्च केला. जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी योग्य नियोजन आम्ही केले आहे, असेही मंत्री राणे यावेळी म्हणाले.