
ब्युरो : यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. हे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला सुरू झालं होतं. नागपूरच्या थंडीत हे हिवाळी अधिवेशन झालं. अधिवेशनातील सर्वसामन्यांचे प्रश्न, त्यावर येत असलेली उत्तरं, विकासकामं, नेत्यांची जुगलबंदी याची चर्चा होते. तशीच चर्चा होते नेतेमंडळीच्या लुकची. उद्योग मंत्री उदय सामंत यांचाही लुक लक्ष वेधून गेला. उदय सामंत या अधिवेशनात गळ्यात मफलर घालून दिसून आले.
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात वेगवेगळ्या डिझाईनचे मफलर घालून उदय सामंत यांनी हजेरी लावली. स्वतःच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी हे फोटोज पोस्ट केलेत.
मुख्यमंत्री शिंदेंच्या बंडानंतर अजित पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादीत बंड झालं. त्यानंतर झालेलं हे पहिलंच अधिवेशन होत. त्यामुळे या अधिवेशनाकडे साऱ्यांच लक्ष लागलं होतं.
राजकारणात अचूक टायमिंगला महत्व असतं. नेमकी हीच बाब हेरून आतापर्यंतची राजकारणातील वाटचाल उदय सामंत यांची दिसून येते. शिवसेनेतील बंडावेळी ठाकरेंची साथ सोडत शेवटचे गुवाहाटीला जाणारे उदय सामंत होते.
भाजप - शिंदे अर्थात शिवसेनेची महायुती झाल्यानंतर उदय सामंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. महायुती सरकारमध्ये उदय सामंत यांच्याकडे उद्योगमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली. मविआ सरकारच्या काळात त्यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी होती.
सहसा कोणत्याही वादात न अडकण्याचे त्यांचे कसब आणि नशीब यांनी त्यांना नेहमी साथ दिली आहे. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी पटापट राजकीय पायऱ्या चढल्याच नाहीतर त्यांनी विरोधकांना त्यांचे गहिरे पाणी ही दाखविले आहे. शिंदेंच्या बंडात सामील झाल्यानंतर देखील पत्रकारांच्या उद्धव ठाकरेंबाबत प्रश्नावर उत्तर देताना ते सावध भूमिकाच घेताना दिसले.
उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदारसंघात 2004 ते 2019 या काळात एकहाती पकड बसवली. जिल्ह्यात तळागाळात कार्यकर्त्यांची फौज तयार करणारे फार कमी नेते असतात. त्यात सामंत यांचा वरचा क्रमांक लागतो. रत्नागिरीत त्यांचा एकछत्री अंमल आहे.
शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा हात असला तरी त्यांची राजकीय कारकिर्द राष्ट्रवादी पक्षातून झाली होती. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करुन त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला.
दहा वर्षानंतर त्यांनी राष्ट्रवादीला जयमहाराष्ट्र केले आणि शिवसेनेचा भगवा हाती धरला. शिवसेनेत जाण्याचा त्यांचा निर्णय योग्य ठरला. त्यांनी अचूक टायमिंग साधले. युतीच्या काळात त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली. त्यानंतर ही त्यांची राजकीय घौडदौड कायम राहिली.