
दोडामार्ग : शिक्षक म्हणजे केवळ धडा शिकवणारा नाही, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार असतो. ज्ञानासोबत संस्कार, आत्मविश्वास आणि कलात्मकतेची ज्योत पेटवून देणारे पाळये शाळेतील उपशिक्षक उदय गवस सर यांना यंदाचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होतं असताना शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी त्यांचे कौतुक करत निवासस्थानी भेट देत विशेष सन्मान केला आहे.
गवस सर हे अध्यापनाबरोबरच संगीतकलेचे जणू उपासकच आहेत. तबला, पेटीवादन आणि गायनकलेत त्यांनी केलेले प्रभुत्व विद्यार्थ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरते. सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी ताल, सूर आणि लय यांचा परिचय करून घेतला आहे. केवळ पाठ्यपुस्तकापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता, कलेची गोडी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवून आत्मविश्वास वाढविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांची विद्यार्थीप्रती असलेलं गुणवत्ता व सर्वगुण संपन्न अध्यापन हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे उदगार यावेळी धुरी यांनी काढले आहेत.
विद्यार्थ्यांचा खरा मार्गदर्शक
गवस सरांचा विद्यार्थ्यांशी असलेला जिव्हाळा आणि शिकवताना दिला जाणारा वैयक्तिक स्पर्श यामुळे विद्यार्थी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. “गवस सर आमच्यासाठी फक्त शिक्षक नाहीत, ते उद्याच्या भविष्यातील युवा पिढीचं प्रेरणास्थान आहेत,” असे मत अनेक विद्यार्थी व्यक्त करतात. त्यांच्या संस्कारातूनच अनेक मुले-मुली शैक्षणिक बरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात झळकत आहेत.
सन्मानाला दाद..
शिक्षक दिनी गवस सरांना जिल्हा परिषदेचा यावर्षीचा दोडामार्ग तालुक्यातून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झालेंनंतर या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग तर्फे त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे समवेत जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि माजी केंद्रप्रमुख गुरूदास कुबल, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे, शाखाप्रमुख सुदन गवस, शिवसैनिक निलेश गवस, मेढे देवस्थान समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ देऊ गवस, तसेच अनिल ठाकूर सर उपस्थित होते.










