उभादांडा सरपंचांचा भाजप प्रवेश हा दीपक केसरकर यांनाच धक्का : संजय गावडे

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय गावडे यांचं प्रसिद्धीपत्रक
Edited by: दीपेश परब
Published on: November 24, 2022 13:35 PM
views 275  views

वेंगुर्ला : उभादांडा सरपंच देवेंद्र डीचोलकर यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली. या बातमीत शिवसेनेचे सरपंच असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र डीचोलकर हे ४ महिन्यापूर्वीच दीपक केसरकर यांचे समर्थक असल्यामुळे ते शिंदे गटामध्ये सहभागी झाले होते. डीचोलकर यांनी गणेश चतुर्थी वेळी सुद्धा शिंदे गटाचा प्रोटोकॉल पाळून बॅनरबाजी केली होती, अशी जोरदार टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.


विकासकामांचे कारण सांगून आणि उभादांडा गावची सर्वस्वी जबाबदारी ही आपलीच आहे, असे ढोंग पांघरून, गावच्या हितासाठी मी हे सर्व काही करत करतो, असा गावामध्ये समज पसरवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. परंतु पंधरा दिवसांपूर्वी उभादांडा ग्रामसेवक निलंबित झाले आहेत. यावरून डीचोलकर हे गावचा विकास कशाप्रकारे करत आहेत, हे दिसून येते. पुढील कारवाई ही सरपंचांवर होणार या भीतीपोटी ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे हा सर्वात मोठा धक्का शिवसेनेला नसून दीपक केसरकर यांनाच आहे, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.