भीषण अपघातात दोन तरुण जागीस ठार

एक जण गंभीर जखमी
Edited by: ब्युरो
Published on: April 03, 2024 10:58 AM
views 3456  views

कोलाड | शशिकांत मोरे : मुंबई -गोवा महामार्गावरील कोलाड रेल्वे पूलाखाली भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने चार चाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार मधील दोन तरुण जागीस ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.  हा अपघात मंगळवारी (ता.२) रोजी रात्री ११:१५ वा. च्या सुमारास घडला आहे. दरम्यान,या अपघातात मृत्यू झालेले दोन्ही तरुण हे धाटाव एमआयडीसीतील डी.एम.सी कंपनीतील कामगार होते.या घटनेमुळे गुरव व खांडेकर कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.     

    मुंबई-गोवा महामार्गावरील खांब बाजू कडून रोहाच्या दिशेने जात असताना कोलाड येथील कोकण रेल्वे पुलाखाली उजवे बाजूला द.ग. तटकरे हायस्कूल रोडने जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना कोलाड बाजू कडून खांबच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या ट्रेलर चालकाने सेलेरिवो कार हि रस्ता ओलांडत असताना तीला जोरदार ठोकर मारून भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात योगेश सुधाकर गुरव (रा. वरसे मूळ रा. नागाव ता. अलिबाग), परेश नामदेव खांडेकर (रा.अष्टमी - रोहा) हे दोन तरुण जागीस गतप्राण झाले. तर  योगेश मनोहर पाटील (रा. वरसे मूळ रा. अलिबाग) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने नवी मुबंई येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केले आहे.  या अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याने कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोलाड पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.

दरम्यान, या अपघातातील दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मयत तरुणांच्या नातेवाईक व मित्र मंडळींनी धाव घेतली होती.   या अपघातानंतर पो.ह. हनुमंत मुंडे यांच्या तक्रारीनुसार ट्रेलर चालक शेरसिंग ओमप्रकाश यादव (रा. मलकापूर - उत्तर प्रदेश) याच्या विरोधात कोलाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक एन. एल. चौधरी पुढील तपास करीत आहेत.